साेलापूर -काेराेनाची लसीकरणाचे बाेगस प्रमाणपत्र काढून देणारे रॅकेट शहरात सक्रिय असल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. महापालिकेच्या नई जिंदगी येथील नागरी आराेग्य केंद्रात लस न घेताच लस घेतल्याचे प्रमाणपत्र दिल्याचे इरफान शेख या नागरिकाने बुधवारी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांना दाखवून दिले. आयुक्तांनी तातडीने आराेग्य अधिकाऱ्यांना या प्रकरणाच्या चाैकशीचे आदेश दिले.
काेराेना लसीचे डाेस न घेताही प्रमाणपत्र काढून देणारी टाेळी सक्रिय असल्याच्या तक्रारी पालिकेकडे येत आहेत. याबाबतचे वृत्त लाेकमतने ४ डिसेंबर राेजी दिले हाेते. आम्हाला पुरावा द्या, कारवाई करू अशी भूमिका प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेतली हाेती. या वृत्ताला नगरसेवकांनी दुजाेरा दिला हाेता. नई जिंदगी परिसरातील इरफान शेख यांनी बुधवारी सकाळी नागरी आराेग्य केंद्रातून काेराेना लसीचा दुसरा डाेस घेतल्याचे प्रमाणपत्र मिळविले. हे प्रमाणपत्र घेउन ते आयुक्त पी. शिवशंकर यांच्या दालनात पाेहाचले. मला लस दिली नाही पण प्रमाणपत्र दिले. या प्रमाणपत्रासाठी ३०० रुपये मागितल्याचेही शेख यांनी आयुक्तांना सांगितले. आयुक्तही अचंबित झाले. त्यांनी तातडीने आराेग्य अधिकारी डाॅ. बसवराज लाेहारे, डाॅ. मंजिरी कुलकर्णी, डाॅ. अरुंधती हराळकर यांना बाेलावून घेतले. शेख यांच्या तक्रारीची शहानिशा करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
--
आराेग्य अधिकाऱ्यांनी केली चाैकशी
आराेग्य अधिकारी डाॅ. अरुंधती हराळकर, डाॅ. मंजिरी कुलकर्णी यांनी बुधवारी सायंकाळी इरफान शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी शेख यांनी या प्रकरणात काेण काेण सहभागी आहे याची माहिती दिली. तुम्ही तातडीने लस घ्या मात्र या प्रकरणात आणखी काेण सहभागी आहे याची माहिती द्या असे सांगितले. यावर ही सर्व माहिती पाेलिसांना देईन असे शेख म्हणाले.
--
यापूर्वी आल्या तक्रारी
शेळगी, शास्त्री नगर, नई जिंदगी, साेरेगाव, रामवाडी या आराेग्य केंद्राबाहेर काही तरुण फिरत असतात. ज्या नागरिकांच्या मनात लसीकरणाबद्दल भीती आहे अशा नागरिकांना हेरतात. त्यांच्याकडून पैसे घेउन प्रमाणपत्र देतात अशा तक्रारी यापूर्वी पालिका प्रशासनाकडे केल्या आहेत.
-
नई जिंदगी आराेग्य केंद्रातील प्रकारणाबाबत अहवाल मागविण्यात आला आहे. चाैकशीनंतर कारवाई हाेईल.
- डाॅ. बसवराज लाेहारे, आराेग्य अधिकारी, मनपा.
--