राज्यातील इतर ग्रामपंचायतींना नगरपंचायतीत रूपांतर होण्यास महाविकास आघाडी सरकारकडून तातडीने मंजुरी मिळते परंतु अकलूज व नातेपुते ग्रामपंचायतीबाबत सर्व प्रक्रिया पार पडूनही शासन दुजाभावाने अंतिम आदेश काढत नाही. शासनाने तिन्ही ग्रामपंचायतींच्या रूपांतराचा निर्णय त्वरित घ्यावा, यासाठी शिवरत्न बंगल्यावर अकलूज, माळेवाडी व नातेपुते ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व नागरिकांची बैठक झाली.
या बैठकीस माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, भाजपचे जिल्हा संघटक सरचिटणीस धैर्यशील मोहिते-पाटील, माजी झेडपी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, धनंजय देशमुख, मामासाहेब पांढरे, ॲड. बी. वाय. राऊत, अकलूजच्या सरपंच पायल मोरे, उपसरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील, माळेवाडीचे सरपंच जालिंदर फुले, उपसरपंच अरुण खंडागळे, नातेपुतेच्या सरपंच कांचन लांडगे, उपसरपंच अतुल पाटील, क्रांतिसिंह माने-पाटील, झेडपी सदस्या सुनंदा फुले, पं. स. सदस्या ॲड. हसीना शेख, हेमलता चांडोले, माजी सरपंच शशिकला भरते, अनिसा तांबोळी, विठ्ठलराव गायकवाड, दादासाहेब मोरे यांच्यासह आजी-माजी सदस्य, अकलूज व नातेपुते येथील व्यापारी, डाॅक्टर्स, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
या बैठकीत शासन जोपर्यंत अकलूज, माळेवाडी व नातेपुते ग्रामपंचायत नगरपालिका व नगरपरिषदेत रूपांतर केल्याचा आदेश काढत नाही, तोपर्यंत साखळी उपोषण करण्याचा निर्धार करून १८ जूनला माळशिरस तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक व २२ जूनपासून अकलूज येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर तिन्ही ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रस्तावावर अंतिम आदेश काढणे बाकी
अकलूज नगरपालिका व नातेपुते नगरपंचायत व्हावी यासाठी दोन्ही ग्रामपंचायतींनी आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कागदपत्रांची पूर्तता, ठराव करून प्रस्ताव शासनदरबारी दाखल केला होता. या प्रस्तावावर सूचना व हरकतीची प्रक्रिया होऊन दीड वर्षे झाली. सदर प्रस्तावाबाबत फक्त अंतिम आदेश काढणे बाकी आहे. त्यानंतर शासनाने राज्यात इतर ग्रामपंचायतीच्या नगरपरिषद केल्या; पण अकलूज, नातेपुते नगरपालिका व नगरपरिषदेबाबतचा अंतिम आदेश काढला नाही. यावर दाद मागण्यासाठी अकलूज व नातेपुते या दोन्ही ग्रामपंचायतींनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. त्याचबरोबर आता लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याची तयारी सुरू केली आहे.