रुसला रे माझा फळा...
गणेशा कधी चालू होईल रे,
माझ्या आवडीची शाळा... अशी विचारणा लाडक्या गणेशासमोर पंढरपुरातील एका कुटुंबातील विद्यार्थ्याने केली आहे.
गणेश ही विद्येची आणि संकटाचे निवारण करणारी देवता म्हणून प्रसिद्ध आहे. सध्या कोरोनाच्या महामारीमुळे गर्दी होईल, अशी ठिकाणे बंद करण्यात आली आहेत. यामध्ये प्रामुख्याने शाळा व कॉलेजचा सहभाग आहे. यंदाच्या वर्षीदेखील गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. पंढरपुरातील इंजिनिअर प्रशांत आल्हापूरकर यांच्या मुलांनीदेखील घरात गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. यावेळी त्यांनी गणेशमूर्तीजवळ वह्या, पुस्तके, पेन ठेवले आहेत. रोज गणेशमूर्तीसह शैक्षणिक साहित्याचेदेखील पूजन प्रशांत आल्हापूरकर, शुभांगी प्रशांत आल्हापूरकर, प्रणाली व ओंकार करत आहेत. त्यांनी गणेशाकडे लवकर शाळा, कॉलेज सुरू कर, विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळू दे, अशी मागणी केली आहे. त्याबाबत त्यांनी फलकदेखील लावले आहेत.
फोटो :
गणेशमूर्तीचे पूजन करताना प्रशांत आल्हापूरकर यांचे कुटुंब. (छाया : सचिन कांबळे)