सोलापूर : लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकून पडलेल्या तमिळनाडूतील ८०० पेक्षा जास्त मजुरांना गावी पाठविण्यासाठी पंढरपूर येथून रेल्वे सोडण्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. दरम्यान, आंध्र आणि तेलंगणा येथील २६० मुली सोनी महाविद्यालयातील निवारा केंद्रात अडकून पडल्या आहेत. या मुलींना मदतीसाठी आंध्रचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना ट्विट केले आहे.
लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्थलांतरित मजूर अडकलेले आहेत. त्यांना त्यांच्या गावी परत पाठविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे. सोलापुरातून इतर राज्यात जाण्यासाठी १२ हजार ८४६ जणांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये निवारा शिबिरातील ३२९० स्थलांतरित मजुरांचा समावेश आहे. इतर जिल्ह्यात जाण्यासाठी ५५२८ अर्ज प्राप्त झाले आहेत. याबाबत जिल्हा प्रशासनाकडून पुढील प्रक्रिया सुरु आहे. इतर जिल्ह्यातून सोलापुरात येण्यासाठी आॅनलाईन अर्ज केलेल्या १०८ जणांना नाहरकत प्रमाणपत्र संबंधित जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आले आहेत. सोलापूर जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात जाण्यासाठी आॅनलाईन अर्ज केलेल्या १५७ अर्जांना नाहरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी संबंधित जिल्हा प्रशासनाकडे अर्ज पाठविण्यात आले आहेत, असे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले.
अर्ज करताना ही काळजी घ्या - आॅनलाईन अर्ज करताना नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाचे प्रमाणपत्र, छायाचित्र, ओळखपत्र अपलोड करावे. नागरिकांना ज्या जिल्ह्यात जायचे आहे त्या जिल्हा प्रशासनाकडून नाहरकत प्रमाणपत्र आल्याशिवाय परवानगी दिली जाणार नाही. तरी नागरिकांनी आॅनलाईन अर्ज करताना दक्षता घ्यावी , असे आवाहन शंभरकर यांनी केले आहे.
सोलापुरातच थांबल्या तेलंगणा राज्यातील मुली- आंध्र, तेलंगणा राज्यातील २६० मुली सोनी कॉलेजमधील निवारा केंद्रात आहेत. या दोन्ही सरकारांनी आपल्या नागरिकांना आपल्या राज्यात घेण्यास तूर्तास मनाई केली आहे. दरम्यान या मुलींनी मदत मिळावी यासाठी चंद्राबाबूंना ट्विट केले होते. चंद्राबाबूंनी यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना ट्विट केले. आता जिल्हा प्रशासन काय करते याकडे लक्ष आहे.