प्रभू पुजारी पंढरपूर : सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची आस मनी घेऊन शेकडो किमीचे अंतर पार करून विठ्ठलभक्त पंढरीत येतो़ पांडुरंगाचे दर्शन करण्यापूर्वी चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करतो, मात्र सध्या चंद्रभागा नदीपात्र कोरडे पडले आहे़ त्यामुळे पाण्याअभावी भाविकांना स्नान करता येत नाही़ दूरवरून आलेल्या भाविकांची निराशा होते़ नदीपात्रातील डबक्यातील पाणीही गढूळ आहे. प्रशासन आणि श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने भाविकांच्या स्नानासाठी सोय करावी, अशी मागणी खुलताबाद येथील ज्ञानेश्वर मोठ्ठे यांच्यासह त्यांच्याबरोबर आलेल्या मोठ्ठे परिवाराने केली.
पंढरपूरच्या चार मोठ्या वारी सोहळ्यादरम्यान चंद्रभागा नदीपात्रात पाणी नसले तरी प्रशासन पाणी सोडून भाविकांची सोय करते़ परंतु पंढरपुरात रोज किमान ३० हजारांपेक्षा जास्त भाविक येतात़ त्यामुळे चंद्रभागा नदीपात्रात कायमस्वरुपी पाणी राहावे याची सोय करणे गरजेचे आहे़, असे भाविकांचे म्हणणे आहे.
यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे सर्वत्र पाणीटंचाई आहे़ उजनी धरण १०० टक्के भरले आहे़ मात्र सोलापूर शहराला पिण्यासाठी पाणी कमी पडल्यानंतर आणि मागणी झाल्यावर भीमा नदीत पाणी सोडले जाते़ ते पाणी चंद्रभागा नदीत आल्यानंतर किमान भाविकांच्या स्नानासाठी अडविले पाहिजे़ ही भाविकांची मागणी लक्षात घेऊन तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी गोपाळपूर येथे बंधारा बांधण्यास परवानगी दिली आणि काही कालावधीत त्याची उभारणी करण्यात आली़ पण पाणी असल्यानंतर वाळू उपसा करता येत नाही, म्हणून वाळू चोर तेथील बंधाºयाचे दरवाजे उघडतात आणि पाणी वाहून जाते़ याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे़ जानेवारी महिन्यात पाणी सोडण्यात आले होते़ तेच पाणी आतापर्यंत नदीपात्रात होते़ आता उन्हाची तीव्रता वाढत आहे आणि ते पाणी खाली वाहून गेल्याने चंद्रभागा नदी कोरडी पडली आहे.
नदीपात्रात काही ठिकाणी डबक्यात पाणी आहे, मात्र तेथे स्थानिक लोक पैसे शोधण्यासाठी फिरत असल्याने ते पाणी गढूळ होते़ त्यामुळे त्या डबक्यात पवित्र स्नान करण्याची मानसिकता होत नसल्याचे भाविकांनी सांगितले़