सोलापूर/ पंढरपूर - श्री विठ्ठलच्या दारात राजकीय प्रार्थना करणार नसल्याचे सांगत, सरकार स्थापनेस आज उद्या यश मिळेल अशी भावना महसूल मंत्री चंद्रकांत पाटील व्यक्त केली. कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा साठी आलेल्या महसूल मंत्री चंद्रकांत पाटील व मानाचे वारकरी बेगड, मिरज (सांगली) येथील मानाचे वारकरी सुनिल ओमासे व त्यांच्या पत्नी नंदा ओमासे यांचा सत्कार विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने संत तुकाराम भवन येथे करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
येणारी आषाढी वारी ही धुरमुक्त वारी करण्याचा संकल्प करण्यात येत आहे. या ठिकाणी मोफत गॅस सिलेंडर तसेच शेगडी मिळेल अशी व्यवस्था शासन करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. ऋतूचक्र बदलले आहे. त्याचा फटका शेतीला बसत आहे. शेतात पिक नीट पिकले नाही तसेच भाव मिळाला नाही की समस्या निर्माण होतात, असेही पाटील म्हणाले.यावेळी मंदिर समितीचे माजी अध्यक्ष डाॅ. अतुल भोसले, सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भोसले, मंदिर समिती कार्यकारी अधिकारी सुनिल जोशी, सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, भगरे गुरूजी, सदस्या शकुंतला नडगिरे, अॅड. माधवी निगडे, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन राजेश धोकटे यांनी केले.
मानाचा वारकरी नांव आहे श्री सुनील महादेव ओमासे वय 42 पत्निचे नांव सौ. नंदा सुनिल ओमासे वय 35 मु.पो.मल्लेवाडी.बेडग ता.मिरज जिल्हा. सांगली वारीची परंपरा 2003 पासुन सलग वारी करत आहेत. व्यवसाय शेती आहे.