माळशिरस : पालकमंत्र्यांच्या बेशिस्त नियोजनामुळे सोलापूर जिल्ह्याला कोरोना महामारीचा मोठा फटका बसत आहे. अशा बिकट परिस्थितीत मंत्री महोदय हे राजकीय व जातीय रंग दाखवत आहेत. त्यामुळे जिल्ह्याला महामारीतून वाचविण्यासाठी पहिल्यांदा दत्तात्रय भरणे यांचे पालकमंत्रीपद त्वरित काढावे, अशी मागणी काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी केली आहे.
कोरोना महामारीमुळे याकडे आम्ही गांभीर्याने पाहत नव्हतो. मात्र, पालकमंत्र्यांची पद्धत निष्क्रीय ठरू लागल्यामुळे जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा भार दुसऱ्या मंत्र्यांकडे दिला जावा, अशी मागणी प्रकाश पाटील यांनी केली आहे.
जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी शेकडो नागरिक प्रतीक्षेत आहेत. याशिवाय ऑक्सिजन व रेमडेसिविर औषधांची जाणून-बुजून जिल्ह्यात कमतरता होत आहे. याविषयी पालकमंत्री मौन धारण करत आहेत. अशा काळातही जाणून-बुजून ठराविक जातीच्या लोकांना झुकते माप तर इतर जातीच्या लोकांकडे दुर्लक्ष करत आहेत. राजमाता अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाबाबतीत कोणालाही विश्वासात न घेता निर्णय घेतले जात आहेत. याशिवाय जिल्ह्यात महत्त्वाच्या विषयांवर धोरणात्मक निर्णय घेत असताना, काँग्रेस, शिवसेना आदी महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांना जाणूनबुजून वगळले जात आहे.
बैठकीचा फार्स
तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून औषधांचा तुटवडा असल्याने अनेक रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. याशिवाय ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली आहे. मात्र, या गोष्टीबाबत पालकमंत्र्यांनी कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. आढावा बैठकीला तालुक्यातील लोकांना जाणूनबुजून बोलावलं नाही. त्यामुळे निष्क्रीय पालकमंत्र्यांनी बैठकीचा फार्स केल्याचा आरोप प्रकाश पाटील यांनी केला.
----
जिल्ह्यातील नागरिकांच्या मनात असुरक्षितता निर्माण झाली आहे. दवाखान्यात बेड उपलब्ध न होणे, इतर सुविधांचा अभाव यामुळे अशा अनेक गोष्टींच्या तक्रारी वाढत आहेत. जिल्ह्यातील विविध पक्षाची नेतेमंडळी महामारीचा सामना करण्यासाठी यापूर्वी शांत होती. मात्र, यात सुधारणा होत नसल्यामुळे आम्हाला नाईलाजाने पालकमंत्र्यांची तक्रार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे करावी लागत आहे.
- प्रकाश पाटील, अध्यक्ष, जिल्हा काँग्रेस कमिटी