टेंभुर्णी : माढा तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या बेंबळे ग्रामपंचायत निवडणुकीत सत्तापरिवर्तन झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोसले यांच्या विमलेश्वर आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. विरोधी गटाचे संजय कोकाटे यांचे समर्थक पोपट अनपट यांच्या सिद्धेश्वर आघाडीने १५ पैकी १२ जागा जिंकून सत्ता खेचून आणली. आमदार बबनराव शिंदे गटास मोठा धक्का मानला जात आहे.
बेंबळी ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधारी भोसले गट पुरस्कृत विमलेश्वर आघाडी व अनपट यांची सिध्देश्वर आघाडी यांच्यात दुरंगी लढत झाली. ५ प्रभाग आणि १५ सदस्य संख्या असलेली तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचाय मानली जाते. या ग्रामपंचायतीवर सिध्देश्वर ग्रामविकास आघाडीचे पोपट अनपट, रत्नाकर कुलकर्णी, विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संचालक विष्णूपंत हुंबे, माजी सरपंच कैलास भोसले यांच्या नेतृत्वाखाली १५ पैकी १२ जागा जिंकून सत्ता काबीज केली.
--
सिध्देश्वर आघाडीचे विजयी उमेदवार :
प्रभाग १ मधील विजयी उमेदवार नामदेव कांबळे, शैला कीर्ते, रंजना कोळी, प्रभाग २ मधून सिध्देश्वर आघाडीचे एकमेव विजयी उमेदवार नमिता अनपट,
प्रभाग ३ मधून विकास अनपट आणि छाया लोंढे, प्रभाग ४ मधून नाना भोसले, उत्तम काळे, संजीवनी भोसले
प्रभाग ५ मधून विजय पवार, ललिता हुलगे, मंजूशा काळे असे १२ उमेदवार निवडून आले; परंतु सिध्देश्वर आघाडीचे विष्णू हुंबे यांना प्रभाग २ मधून दारूण पराभवास सामोरे जावे लागले. त्यामुळे 'गड आला पण सिंह गेला' अशी अवस्था सिध्देश्वर आघाडीची झाली.
सिध्देश्वर ग्रामविकास आघाडीचे विजय पवार हे ३४१ एवढ्या विक्रमी मताधिक्याने विजयी झाले. ते संजय कोकाटे यांचे कट्टर समर्थक असल्याने त्यांना पराभूत करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न झाले; परंतु सर्वांना धक्का देत त्यांनी ३४१ मतांची आघाडी घेत समाधान भोसले यांचा पराभव केला. गोविंद भोसले व पार्टी प्रमुख दिलीप भोसले यांच्या विमलेश्वर आघाडीला पराभव पत्कारावा लागला. विशेषत: दिलीप भोसले नेतृत्व करीत असलेल्या प्रभाग ३ मध्ये आघाडीचा पराभव झाला. या प्रभागातील ३ पैकी नितीन पाटील या एकमेव उमेदवाराच्या विजयावर भोसले गटास समाधान मानावे लागले. प्रभाग २ मधून संजय पवार व अनिता मस्के यांनी विजय प्राप्त करत आश्चर्याचा धक्का दिला.
---
फोटो : १८ टेंभुर्णी
बेंबळे येथे सिद्धेश्वर ग्राम विकास आघाडीचे उमेदवार व कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा केला.