सोलापूर : महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची बदली त्यांच्या विनंतीनुसार करण्यात आली, असे म्हणणे राज्य शासनातर्फे मंगळवारी उच्च न्यायालयात सादर करण्यात आले. त्यावर न्यायालयाने सुनावणीची तारीख २८ जुलै नेमली आहे. न्या. नरेश पाटील व न्या. रवींद्र घुगे यांच्यासमोर आयुक्तगुडेवार यांच्या बदलीविरोधात दाखल झालेल्या याचिकांवर सुनावणी सुरू आहे. यात आज शासनातर्फे सरकारी वकिलाने लेखी म्हणणे न्यायालयात सादर केले. आयुक्त गुडेवार यांची बदली त्यांच्या विनंतीवरूनच करण्यात आली, असे त्यात नमूद केले आहे. त्यावर न्यायालयाने सुनावणीची पुढील तारीख नेमली. ११ जुलैच्या सुनावणीनंतर उच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर या सुनावणीची तारीख चुकीची पडली होती. ती सोमवारी सायंकाळी दुरुस्त करण्यात आली. शासनाच्या म्हणण्यावर याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. रामदास सब्बन यांचा युक्तिवाद होणार आहे. गुडेवारांच्या बदली प्रकरणावर उच्च न्यायालयाने पुढील आदेश होईपर्यंत ‘जैसे थे’ स्थिती ठेवण्याचा आदेश दिला आहे. तेव्हापासून जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांच्याकडे पदभार आहे. यामुळे महापालिकेची महत्त्वाची कामे खोळंबली गेली आहेत. अर्थसंकल्पीय सभा झालेली नाही. कामाचे टेंडर, बिले मंजुरीची कामे प्रलंबित राहिली आहेत. आता सुनावणी लांबल्यामुळे कामाचा भार वाढत जाणार, अशी चिन्हे दिसत आहेत.
विनंतीनुसार बदली
By admin | Published: July 16, 2014 1:01 AM