यशवंत सादूलसोलापूर : शहराच्या पूर्व भागातील तेलंगी पाच्छा पेठ परिसरात आढळून आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णामुळे या भागातील एक किलोमीटर परिसर सील करून पोलिसांनी सर्व रस्ते बंद केले आहेत. या परिसरातील नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई असून संचारबंदीची कडक अंमलबजावणी होत आहे़ कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी नागरिक ही आपल्या गल्ली बोळात बाहेरील कोणत्याही बाहेरील व्यक्तीस येण्यास मज्जाव करीत आहेत़ भाजीविक्रते, दूधवाले यांनाही प्रवेश नाकारत आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या खानपानात बदल होत आहे. सकाळची सुरुवात विनादुधाच्या काळ्या चहाने होत आहे . पाले भाज्यांची उणीव डाळ ,आमटी, बेसन,पिटला, लोणचे ,चिंचेचेसार याद्वारे भागविली जात आहे .असे दिवस काढू पण कोरोना पासून बचाव करू कोरोना ला परतून लावू अशी प्रतिक्रिया परिसरातील नागरीकांनी व्यक्त केले आहे.
सील केलेल्या परिसरात जोडबसवण्णा चौक, रविवार पेठ, कवितानगर पोलीस वसाहत ,कन्ना चौक, दाजी पेठ, भद्रावती पेठ, न्यू पाच्छा पेठ, शांती चौक, मार्कर्डेय चौक, कुचन नगर, राहुल गांधी झोपडपट्टी, गिरी झोपडपट्टी, संयुक्त झोपडपट्टी हा भाग येत असून बहुतेक विडी व यंत्रमाग कामगारांची ही वस्ती आहे़ हातावर पोट असलेल्या वस्तीतील लोकांना रोजच्या रोज जीवनावश्यक वस्तू आण आणण्याशिवाय पर्याय नाही . अशाही परिस्थतीत कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी आपल्या दिनचर्येत व खाण्यापिण्यात बदल करत असल्याचे दिसून येत आहे.
मार्कडेय रुग्णालयालगत असलेल्या फलमारी झोपडपट्टीतील मागील दोन तीन दिवसांपासून दूधवाल्यास मज्जाव केले असून संपूर्ण वस्तीतील नागरीकांनी घराबाहेर पडायचे नाही हे ठरवून चारही बाजूने रहदारी बंद केले आहे. परिणामी बहुतेक घरात विनादुधाचा काळा चहा बनविले होते़ येथील राजेश्वरी सुनील कोंतम या गृहिणी सकाळी दुधा विना काळा चहा करतानाचे चित्र दिसले .अशीच परिस्थिती विनोबा भावे झोपडपट्टी ,कुचंन नगर परिसरात बहुतेक घरात पहावयास मिळाले. गिरी झोपडपट्टी व व्यंकटेश नगर , भगवान नगर भागात काही नागरिक चुलीवर स्वयंपाक करताना दिसून आले.
संपूर्ण सील केलेल्या या भागात संचारबंदीची कडक अंमलबजावणी होत असल्याने भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांना बाहेर पडता येत नाही. बाजार समिती बंद झाल्याने भाज्यांची आवक कमी झाली आहे़ त्यातच कडक संचारबंदीमुळे या सील केलेल्या भागात भाजीविक्रेत्यांना व्यवसाय करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. परिणामी संपूर्ण याभागात भाजीपाला मिळणे कठीण झाले आहे़ या भागातील गोरगरीब, कष्टकरी जनतेकडे भाजी पाला व फळभाज्या साठवुन ठेवण्यासाठी फ्रीज नाहीत. त्यामुळे भाजीऐवजी तूरडाळ, मसूर, मूग, हरभरा दाळ या सोबत पिटले, शेंगचटणी खाण्यास सुरुवात केली असल्याचे दिसून येत आहे.
रेशनिंगचे धान्य मिळाले असले तरी ते दळून आणण्यात अडचणी येत असल्याने बहुतेक घरांमध्ये फक्त भातच शिजू लागला आहे. सोबत तूरडाळ आमटी म्हणजेच चारुबुव्वा वरच येथील नागरिक समाधानी होत आहेत. पूर्व भागातील बहुतेक घरात सकाळी चहासोबत खारी, टोस्ट, बटर असे बेकरीचे पदार्थ खाण्याची सवय आहे़ लोकडाऊन आणि आर्थिक अडचणीमूळे ही सवय लोक विसरत चालले आहेत .घरातील लहान मुले ही हट्ट करणे सोडत आहेत हे सकारात्मक बदल पहावयास मिळाला.