‘कोविड-१९’चा आजार तुमच्या माझ्या आयुष्यात येऊन दोन-अडीच महिने उलटले तरीही आपण कोरोना विषाणूला नीट समजून घेतलेले नाही हे आपल्या जगण्या-वागण्यातून स्पष्ट दिसतेय. आपल्या चुकांमुळेच कोरोना शेफारलाय. या विषाणूला स्वप्रयत्नाने तुमच्या आमच्या शरीरात प्रवेश करता येत नाही.आपण सर्व गोष्टी व्यवस्थितपणे पाळल्या तर कोरोनाला लांब ठेवणे शक्य आहे. म्हणून हा आजार आणि विषाणू नेमका कसा आहे हे प्रत्येकाने जाणून घेतले पाहिजे. या आजाराचे विषाणू दोन प्रकाराने पसरतात. पहिल्या प्रकारात बाधित रुग्णाच्या खोकल्यातून द्रव स्वरूपातले तुषार हवेत पसरतात. या अतिशय छोट्या तुषारामध्ये देखील अतिसूक्ष्म विषाणू लाखोंच्या संख्येने असतात. जे आजूबाजूला असलेल्या व्यक्तीच्या श्वासातून श्वसनमार्गात जातात आणि ते बाधित होतात. संसर्गाचा दुसरा प्रकार म्हणजे बाधित रुग्णाच्या खोकल्यातले तुषार आणि त्यातले विषाणू आजूबाजूच्या वस्तूंवर पडतात. त्या वस्तूंना निरोगी व्यक्तीने हाताने स्पर्श केला आणि तोच हात स्वत:च्या चेहºयाला, नाकाला, तोंडाला, लावला तर त्यातून व्यक्तीला संसर्ग होतो. जगभर थैमान घालणाºया कोरोना विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून साबणाने हात धुवा, असा साधा उपाय सांगितला आहे. हात कसे धुवावेत त्याविषयी देखील शास्त्रशुद्ध पद्धत सांगितली. ‘सोशल डिस्टन्स’ आणि साबणाने हात धुणे यासारख्या परवडणाºया सोप्या उपायांतून संसर्ग रोखता येऊ शकतो. परंतु सहज शक्य गोष्टींचा आपण कंटाळा करतो आणि छोट्याशा दुर्लक्षामुळे संसर्ग होतो. सहज सोपा परंतु थोडासा कंटाळवाणा वाटणाºया या गोष्टी केल्याशिवाय कोरोनावरील लस आणि औषध तयार होईपर्यंत दुसरा पर्याय नाही.
सोलापुरातील सद्यस्थिती खूपच चिंताजनक आहे. हॉटस्पॉट म्हणून शहराची ओळख निर्माण झाली. वाढत्या कोरोना रुग्णाच्या संख्येमुळे रेड झोन म्हणून शहर बदनाम होतेय. इथल्या कष्टकरी, गरीब झोपडपट्टीतल्या लोकांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. प्यायला पाणी नाही तर दिवसभर साबणाने धुवायला पाणी कोठून आणणार. सर्दी, खोकला यांसारखी प्राथमिक लक्षणे दिसली तरी औषधोपचार घेऊ शकत नाहीत. म्हणून बाधितांची संख्या रोज वाढत आहे. लॉकडाऊनच्या शेवटचा टप्पा संपायला आला. लवकरच परिस्थिती पूर्ववत करावी लागेल, तेव्हा शहरातील जनजीवन कसे असेल याची भीती वाटते. म्हणून प्रत्येकाने आतापासूनच संभाव्य परिस्थिती ओळखून कोरोनासोबत जगायला शिकलं पाहिजे.
कोरोनांनंतरचे जग सर्वांगाने बदललेले असेल. पूर्वीसारखं सामान्य जनजीवन शक्य नाही. एका नव्या आरोग्य संकटाची सुरुवात होईल.. ज्यामध्ये स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणाºयांना क्षमा नाही. कोरोनासह जगा किंवा रोगराईला सामोरे जा, असेच थेट पर्याय असतील. कुठलेही भेद न जाणणारा कोरोना विषाणू थैमान घालेल. हळूहळू सगळ्या गोष्टी शासनाच्या ताब्यात जातील. स्वघोषित सत्ताकेंद्रे संपुष्टात येतील आणि त्यावर बढाया मारणारी तरुणाई उघड्यावर येईल. सामाजिक विषमता वाढेल. जनसामान्यांची क्रयशक्ती कमी होईल. आर्थिक परिस्थिती वाईट होईल. मनोरुग्णांची संख्या वाढेल आणि आत्महत्या वाढतील. उद्योग, व्यवसाय, व्यापार, शिक्षण, सर्वच क्षेत्रात आमूलाग्र बदल होतील. अशा बदलांना सामोरे जाण्यासाठी सक्षम व्हावे लागेल. म्हणून सोलापूरकरांनी अधिक जबाबदारीने आजच्या संकटाचा मुकाबला करायला तयार व्हावे लागेल. बदल स्वीकारावे लागतील. तरच येत्या केवळ दहा वर्षांनी म्हणजे २०३० मध्ये येऊ घातलेल्या ‘क्लायमेट ३०’सारख्या कोरोनापेक्षा अधिक गंभीर समस्येला सामोरे जाता येईल.- प्रा. विलास बेत(लेखक परिवर्तनवादी चळवळीचे समर्थक आहेत.)