रेवणसिद्ध जवळेकर
सोलापूर : तुकाराम मुंढे मनपा आयुक्त असताना आपत्कालीन रस्त्यावरुन प्रशासन अन् पंच कमिटीत ‘तू तू- मंै मंै’चा खेळ रंगला होता. तसा काहीसा खेळ आता स्मार्ट सिटी अंतर्गत होम मैदानाच्या सुशोभीकरणाच्या कामावरुन रंगत चालला आहे. यात्रा कालावधीत होम मैदानावर वाहनांना बंदीची अट घालण्यात आल्याने पंच कमिटीने आता पार्क चौकालगतच्या नॉर्थकोट मैदानाचा प्रस्ताव दिला असून, तसे पत्र मनपा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांना देण्यात येणार आहे. बदलत्या परंपरेचे हे बदलतं सोलापूरचं चित्र स्मार्ट सिटीमुळे पालटत आहे, हे नक्की.
सोलापूरचा स्मार्ट सिटीत समावेश झाल्यानंतर रंगभवन चौक चांगलाच साकारलाय तर होम मैदानाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मैदानाभोवती लोेखंडी ग्रील असलेले कंपाऊंड बांधण्यात आले आहे. उभारण्यात आलेल्या वॉकिंग ट्रॅकमुळे मैदानाचे लूक पूर्णत: बदलले आहे. सुशोभीकरणाच्या कामाला कुठे बाधा येऊ नये, धोका पोहोचू नये यासाठी पंच कमिटीला होम मैदान केवळ होम विधीसाठी मिळेल. पाळणे आणि स्टॉल्स लावण्यावर बंदीचा फतवा मनपाने काढला होता.
मात्र तो फतवा बंद पाकिटाद्वारे काढून महापालिकेने होम मैदान दीड महिन्यासाठी पंच कमिटीच्या ताब्यात दिले. त्यानुसार सोमवारी पंच कमिटीने मैदानावर भगवा ध्वज फडकावून मैदान रीतसर ताब्यात घेतले.
मैदानावरील १३ पैकी चार प्रवेशद्वार उघडे- मैदानाच्या भोवताली कंपाऊंड बांधण्यात आले असून, मैदानात जाण्यासाठी एकूण १३ प्रवेशद्वार आहेत. पैकी मार्केट पोलीस चौकी, प्रशासकीय इमारतीसमोरील, ह. दे. प्रशालेसमोरील आणि भगिनी समाजलगतचे प्रवेशद्वार यात्रेसाठी खुले राहतील. आपत्कालीन प्रश्न निर्माण झाला तर सर्वच प्रवेशद्वार खुले करण्याची यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली आहे.
पाळण्यांचे साहित्य आणण्याचा प्रश्न !- यंदा होम मैदानावरच पाळणे आणि अन्य स्टॉल्स असतील, असे पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी होम मैदान ताब्यात घेतल्यानंतर सांगितले. वास्तविक होम मैदानावर पाळणे उभारण्यासाठी ट्रकभर साहित्य आणावे लागते. यात्रेच्या काही दिवस आधी पाळणे उभे केले जातात. त्यामुळे गर्दीचा प्रश्नच निर्माण होत नाही. म्हणून पाळणे टाकणारे त्यांचे साहित्य ट्रकने आणू शकतात, असे पंच कमिटीच्या वतीने सांगण्यात आले.
वॉल कंपाऊंडमुळे होम मैदान आता बंदिस्त आहे. यात्रेत जिथे प्रवेशद्वार खुले असतील, तिथे मैदानावरील भाविकांसाठी एक्झिट (बाहेर पडण्याचा मार्ग) असा फलक लावण्यात येईल.-बाळासाहेब भोगडेचेअरमन- जागा वाटप समिती.