सोलापूर : टास्क पूर्ण करण्याच्या नावाने तरूणाकडून १ लाख पाच हजार रूपये ऑनलाईन पद्धतीने घेत ते पैसे परत न देता फसवणूक केल्याप्रकरणी एका माेबाईल धारक व सोशल मीडियावर वापरकर्त्यावर विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत असिफ आयुब शेख ( वय २४, रा. गजानन नगर, होटगी रोड) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी आसिफ शेख हे घरात असताना त्यांना सोशल मीडियावर एक लिंक आली. त्या लिंकवर क्लिक केल्यावर त्यांना एका अनोळखी इसमाने फोन करून टास्क बद्दलची माहिती देत त्यांचा विश्वास संपादन करून घेतले. त्यानंतर फॉर्म भरताना शेवटी पैसे भरण्यास सांगितले. अशाच प्रकारे १ लाख रुपये भरल्यानंतर आरोपींनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शेख यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून एका मोबाईल धारकावर व सोशल मीडिया वापरकर्त्यावर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलिस निरीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील करत आहेत.