सोलापूर : सीना नदीच्या पुराचे पाणी हत्तूर नाल्यावरून वाहू लागल्याने सोलापूर ते विजापूर महामार्गावरील बंद करण्यात आलेली वाहतूक़ ३0 तासानंतर शनिवारी सकाळी सुरू करण्यात आली.
चार दिवसापूर्वी पुणे, सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यात झालेल्या पावसाने भीमा व सीना नदी दुधडी भरून वाहू लागल्या आहेत. भीमेच्या पुराने सीनेचा प्रवाह थांबल्याने हत्तूर शिवारात शेतामध्ये पाणी घुसले. हत्तूरनाला ते वडकबाळ पुलाच्या कॉर्नरपर्यंत महामार्गावर पाणी आल्याने शुक्रवारी पहाटेपासून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे वडकबाळ व हत्तूरच्या दुतर्फा वाहनांचा रांगा लागल्या होत्या. शनिवारी सकाळी नदीच्या पुराचे पाणी ओसरले. यामुळे महामार्ग खुला झाल्याने सार्वजनिक बांधकाम व महामार्ग विभागाच्या अधिकाºयांनी रस्त्याची पाहणी केली.
या मार्गावर नव्याने रस्ता करण्यात आल्याने पुराच्या पाण्याने रस्त्याला काहीही झाले नसल्याचे दिसून आले. त्यामुळे वाहतुकीला परवानगी देण्यात आली. सकाळी आठ वाजेपासून या मार्गावर वाहतूक सुरू झाली, अशी माहिती मंद्रुप पोलिसांनी दिली.
वडकबाळ, टाकळी पूल शाबूतसीना व भीमा नदीला महापूर आल्याने अनेक मार्गावरील पुलांवर पाणी आले. पण टाकळी व वडकबाळ पुलापर्यंत पाणी आलेले नाही. विजापूर महामार्गावरील हत्तूरनाला ते नदीच्या पुलाच्या वळणापर्यंत रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद झाली होती. टाकळी पुलावरील वाहतूक़ मंद्रुपमार्गे पूर्वतत सुरू होती.