सोलापूर शहर काँग्रेसचा पदभार आता चेतन नरोटेंकडे; नाना पटोलेंनी दिले नियुक्तीपत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 03:14 PM2022-12-08T15:14:25+5:302022-12-08T15:17:02+5:30
मुंबईतील कार्यक्रमात माजी नगरसेवक विनोद भोसले, सीए सुशील बंदपट्टे व कार्यकर्ते उपस्थित होते. या निवडीबद्दल नरोटे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : सोलापूर शहर काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी ज्येष्ठ माजी नगरसेवक व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे यांचे विश्वासू चेतन नरोटे यांची निवड झाली आहे. या निवडीचे पत्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते गुरूवारी मुंबईत देण्यात आले.
यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आ. प्रणिती शिंदे या उपस्थित होत्या. दरम्यान, काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश वाले यांनी मुदत संपल्याने राजीनामा दिला होता, त्यामुळे त्यांच्या जागेवर नरोटे यांची निवड करण्यात आली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभमीवर हा बदल झाल्याचे मानण्यात येत आहे. मुंबईतील कार्यक्रमात माजी नगरसेवक विनोद भोसले, सीए सुशील बंदपट्टे व कार्यकर्ते उपस्थित होते. या निवडीबद्दल नरोटे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
जुन्या-नव्यांना सोबत घेऊन महापालिका निवडणुकीत काँग्रेसची ताकद दाखविण्याची जबाबदारी नुतन शहराध्यक्ष नरोटे यांच्यावर असणार आहे. सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांसोबत त्यांचे मैत्रिपूर्ण संबंध असून त्याचा कितपत फायदा पक्षाला होईल हे आगामी काळच ठरवेल असेही बोलले जात आहे.