कुर्डूवाडी शहर दिवसेंदिवस विस्तारित होत आहे. येथील लोकसंख्या ४० हजारांच्या जवळपास गेली आहे. शहरात क वर्गीय नगरपालिका असून, येथील रेल्वे जंक्शनमुळे शहराचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेले आहे. शहरातील पोलीस स्टेशन, लोहमार्ग पोलीस स्टेशन, ग्रामीण रुग्णालय व विद्युत वितरणचे उपविभागीय कार्यालयात मुख्य इन्चार्जची पदे अनेक दिवसांपासून रिक्त आहेत. त्यामुळे संबंधित कार्यालयाचा कारभार सध्या त्याच कार्यालयातील कनिष्ठ अधिकारी प्रभारी म्हणून पाहत आहेत.
येथील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोरख गायकवाड यांची नुकतीच बदली झाल्याने, या पदावर प्रभारी म्हणून सहायक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे हे काम पाहत आहेत, तर लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पद गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त आहे. तेथे प्रभारी म्हणून सहायक पोलीस निरीक्षक अमर कदम काम सध्या पाहत आहेत, तर विद्युत महावितरणच्या कुर्डूवाडी उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता पद नऊ महिन्यांपासून रिक्त आहे. इथले उपकार्यकारी अभियंता श्रीनिवास पडाल यांची बदली झाल्याने हे पद रिक्त होते, त्याचा प्रभारी कारभार शहरचे सहायक अभियंता उल्हास कानगुडे यांच्याकडे देण्यात आला आहे.
याचबरोबर, ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक पद हेही अनेक वर्षांपासून रिक्तच आहे. २०११ला डॉ.अशोक मेहता हे या पदावरून निवृत्त झाल्यानंतर हे पद प्रभारीवर चालत आहे. तेव्हापासून डॉ.शशिकांत त्रिंबके, डॉ.संतोष अडगळे यांनी काही दिवस तर सध्या डॉ.सुनंदा गायकवाड या प्रभारी म्हणूनच काम पाहत आहेत.
----
अपुऱ्या मन्युष्यबळाचा सामान्यांना त्रास
शहराची वाढती लोकसंख्या, त्यामुळे वाढलेला कामाचा ताण व त्यातच कर्मचाऱ्यांचे अपुरे संख्याबळ यामुळे विविध प्रमुख अधिकाऱ्यांची रिक्तपदे त्वरित भरावीत. याचा दैनंदिन कामकाजावर परिणाम होतो, याचा सामान्य जनांना त्रास होतो, यावर विचार व्हावा, अशी मागणी शहरातील नागरिकांतून होत आहे.
....................