सोलापूर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व आरोग्य मंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी पंढरपुरातील सेवा सुविधांची पाहणी आज मोटरसायकलवर फिरून केली. दरम्यान, बुधवारी पंढरपुरात आषाढीचा महासोहळा होणार आहे.
या सोहळ्यानिमित्त पंढरपुरात पंधरा लाख भाविक दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याचं अनुषंगाने वारकऱ्यांना देण्यात येत असलेल्या सेवा सुविधांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी पंढरपुरात दाखल झाले. त्यांच्यासोबत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.
प्रारंभी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निळोबारायांच्या पालखी सोहळ्यात दाखल झाले. काही अंतर पायी चालत भजन करीत विठ्ठलाचे नामस्मरण केले. त्यानंतर प्रशासनाच्या वतीने पुरविण्यात आलेल्या सेवा सुविधांची पाहणी केली. पालखीतळ, चंद्रभागा नदीचा किनारा, दर्शन रांग, ६५ एकर वाळवंट परिसर, मंदिर परिसर आदी विविध ठिकाणची पाहणी मोटारसायकलवर फिरून केली अन् आवश्यक त्या महत्त्वाच्या सूचना प्रशासनाला दिल्या.