आप्पासाहेब पाटील, सोलापूर: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आषाढी यात्रेतील सोहळ्याचा आढावा घेण्यासाठी रविवार २५ जून २०२३ रोजी सायंकाळी तीन ते चार वाजण्याच्या सुमारास पंढरपुरात येणार आहेत. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती तयारी युध्दपातळीवर सुरू असल्याचे सांगण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास सोलापूर विमानतळावर दाखल होतील. त्यानंतर शासकीय वाहनाने ते पंढरपूरकडे मार्गस्थ होतील. पंढरपुरात पोहल्यानंतर ते पालखी तळ, विठ्ठल मंदिर परिसर, चंद्रभागा नदी परिसर यासह आदी विविध ठिकाणी भेटी देऊन पाहणी करणार आहेत. त्यानंतर शासकीय विश्रामगृहात आषाढी वारीतील तयारी, आढावा व विविध उपाययोजना संदर्भात माहिती घेऊन आवश्यक त्या सुचना करणार आहेत.
आषाढी एकादशी २९ जून २०२३ रोजी होणार आहे. दोन्ही संतांच्या पालख्या सोलापूर जिल्ह्यात दाखल झाल्या असून २८ जून २०२३ रोजी पंढरपूर शहरात दाखल होणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री हे सहकुटुंब शासकीय महापूजेसाठी हजर राहतील असेही सांगण्यात आले. सध्या आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रासह अन्य राज्यातील भाविक पंढरपुरात दाखल होऊ लागले आहेत. दर्शनरांगेतील भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.