सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात असलेल्या शिराळा-पांगरी हद्दीत नववर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १ जानेवारी रोजी अचानक स्फोट झाला. या दुर्घटनेत आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत. या धक्कादायक घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मृतांना आर्थिक मदत करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले असल्याची माहिती आ. राजेंद्र राऊत यांनी दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करून बार्शीच्या दुर्घटनेबाबत माहिती दिली आहे. शिवाय मृत व्यक्तींना श्रद्धांजली व जखमी झालेल्यांची प्रकृृतीत सुधारणा व्हावी यासाठीही प्रार्थना केली आहे. मुख्यमंत्री शिंदे आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील फटाका फॅक्टरीमध्ये झालेल्या भीषण स्फोटात काही व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला असून कंपनीतील काही कामगार अजूनही अडकले आहेत. अग्निशमन दलाचे बचावकार्य आणि राहतकार्य अद्याप सुरू आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली तसेच जखमी झालेल्या व्यक्तींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी मी प्रार्थना करतो असे नमूद केले आहे.
या घटनेत आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गंभीर जखमी रूग्णांवर बार्शी व सोलापूर येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनास्थळाला जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, आमदार राजेंद्र राऊत, खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींनी भेट दिली आहे.