सोलापूर : राज्यातील दुष्काळी स्थितीच्या उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी, अभियंते व कृषी अधिकाºयांना मुंबईच्या बैठकांना बोलावू नका व पालकमंत्र्यांनीही जिल्ह्यातच तळ ठोकून रहावे असा फतवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी जारी केला आहे.
राज्यात दुष्काळाची तीव्रता वाढत आहे. ८२ लाख शेतकºयांपर्यंत मदत पोहोचवायची आहे. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, जलसंधारण, जलसंपदा, पाणीपुरवठा विभागातील जिल्हा व तालुकास्तरावरील अभियंते, कृषी अधिकाºयांना बैठकांसाठी मुंबईला आमंत्रित करू नये. जिल्हा व तालुका अधिकाºयांच्या मंत्रालयात बैठका न घेता जिल्हास्तरावरच बैठका घेण्यात याव्यात. अशा बैठका पालकमंत्री व संबंधीत विभागाच्या मंत्र्यांनीच बैठका विभाग किंवा जिल्ह्यातच घ्याव्यात. इतर मंत्र्यांनी मंत्रालय किंवा विभागीय स्तरावरील बैठकांना अधिकाºयांना बोलावू नये.
जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी बहुतांश वेळा मंत्रालय स्तरावरून आयोजित व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये व्यस्त राहिल्याने इतर कामकाजासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे मंत्रालय स्तरावरून आयोजित करण्यात येणाºया व्हिडीओ कॉन्फरन्स महिन्याच्या दुसºया व चौथ्या गुरुवारी व मंत्र्यांनी आठवड्यातून फक्त एकदा म्हणजे बुधवारी घेण्यात याव्यात अशा सूचना मुख्य सचिवांना देण्यात आल्या आहेत.
महसूल व जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांना बैठका व व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये जास्त वेळ अडकावून न ठेवता त्यांच्या कार्यक्षेत्रातील दुष्काळी कामांसाठी पुरेसा वेळ देण्यात यावा असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जारी केलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे. हे परिपत्रक सर्व मंत्री, जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाºयांना तातडीने पाठविण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे परिपत्रक मिळाले आहे. त्यामुळे बुधवारच्या बैठकीला मी जाणार नाही. जिल्ह्यातील शेतकºयांच्या प्रश्नांसाठी दौरे घेण्याचे सूचित करण्यात आले आहे. त्यामुळे दुष्काळीकामांचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे. - विजयकुमार देशमुख, पालकमंत्री