बार्शी : राजेंद्र राऊत आमदार होताच त्यांच्यासाठी बोललेला नवस फेडण्यासाठी त्यांचे पुत्र तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन रणवीर राऊत यांनी तुळजापूरची पायी वारी केली. शनिवारी रात्री बार्शीतून सुरू केलेली ही पायी वारी ‘आई राजा उदो..उदो’च्या जयघोषात रविवारी पहाटे पूर्ण झाली.
तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार राजेंद्र राऊत यांचे सुपुत्र रणवीर राऊत यांनी आई तुळजाभवानीला नवस केला होता. वडील राजेंद्र राऊत आमदार म्हणून निवडून येण्यापूर्वी बार्शी-तुळजापूर पायी प्रवास करण्याचा नवस बोलला होता.
मित्र आणि कार्यकर्त्यांसह रणवीर यांनी बार्शी-तुळजापूर पायी प्रवास केला. विधानसभा निवडणुकीत राजेंद्र राऊत यांचा ३०७६ मतांनी विजय झाला. रणवीर राऊत यांनी तुळजाभवानी मातेला बोलून दाखवलेली इच्छापूर्ती झाली. पायी प्रवास करत ते तुळजाभवानी मातेसमोर नतमस्तक झाले.
दरम्यान, शनिवारी रात्री शहरातील देवीची नगरसेवक विजय राऊत यांच्या हस्ते आरती करून या पायी वारीला सुरुवात केली. त्यावेळी उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, उपसभापती अविनाश मांजरे, नगरसेवक काका फुरडे, भैय्या बारंगुळे, बापू जाधव, केदार पवार, रणजित बारंगुळे उपस्थित होते.