पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अकलूज येथे एका १५ वर्षीय मुलीचा विवाह पंढरपूर येथील शिक्षण घेत असलेल्या १९ वर्षीय मुलाशी गुरुवारी (दि. ३१) येथे होणार असल्याची माहिती जिल्हा बालकल्याण समितीला मिळाली. ३० डिसेंबर रोजी समितीच्या अध्यक्ष अनुजा कुलकर्णी, सुवर्णा बुंदाले, प्रकाश ढेपे व विलास शिंदे यांनी अकलूज पोलीस ठाणे गाठून राऊतनगरात अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती दिली. पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर, बालकल्याण समितीसह पोलिसांचे पथक विवाहस्थळी पोहोचले. येथे लग्नापूर्वी हळद लावण्याची तयारी सुरू होती. पोलीस मुलीच्या आईवडिलांसह नातेवाइकांना पोलीस स्टेशन येथे घेऊन आले. मुलीच्या वडिलांना बालविवाह प्रतिबंध कायद्याची माहिती देऊन समापुदेशन करीत मुलीचे लग्न विवाहयोग्य होईपर्यंत करणार नसल्याचे कबूल करून घेऊन तसा लेखी जबाब घेतला. यावेळी माळशिरस पंचायत समितीच्या सहाय्यक संरक्षण अधिकारी पी.ए. पुजारी उपस्थित होत्या.
अकलूजमध्ये बालविवाह रोखला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2021 4:16 AM