लग्नसोहळ्यासाठी वऱ्हाडी मंडळीही जमलेली होती. परंतु त्यातील वधूचे वय हे लग्नासाठी योग्य नसल्याची गोपनीय माहिती बालसंरक्षण अधिकारी ताटे व माढा पंचायत समितीचे बालविकास प्रकल्प अधिकारी विनोद लोंढे यांना दूरध्वनीवरून मिळाली. लागलीच त्यांनी ग्रामविकास अधिकारी विजय माढेकर यांना पोलिसांच्या मदतीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे ग्रामविकास अधिकारी विजय माढेकर, पोलीस हवालदार रंदिवे, पोलीस कर्मचारी आरकिले यांचे पथक लग्ना लागण्याच्या अगोदरच विवाहास्थळी पोहोचले.
यावेळी संबंधित पथकाने मुलीच्या वडिलांना वय कमी असल्याने लग्न का करता, असे विचारले. त्यावर हा साखरपुडा असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु संबंधित पथकाने आलेल्या वऱ्हाडाला याबाबत विचारले तर लग्न असल्याचे समजले. त्यामुळे बालसंरक्षण अधिकारी ताटे यांच्या सूचनेनुसार पथकाने अल्पवयीन मुलीला व वडिलांना ताब्यात घेतले. कुर्डूवाडी पोलिसांत जबाब घेऊन पुढील कारवाईसाठी सोलापूर येथील बालसंरक्षण कार्यालयाकडे ताब्यात दिले.