सोलापूर : संपूर्ण जग हे व्हॅलेंटाईन डे निमित्त आपले प्रेम व्यक्त करते. या प्रेमाचा उत्सव साजरा करत असतो. या प्रेमाच्या उत्सवावेळी आपल्या आई-वडिलांचे पूजन केल्यास हा दिवस अधिक सत्कारणी लागेल, या विचाराने माणेकरी शाळेमध्ये आई-वडिलांचे पूजन करण्यात आले. मुलांकडून आपली पूजा होत असलेले पाहून पालकांच्या डोळ्यात अश्रू आले. कार्यक्रमास उपस्थित असलेल्यांनी हा क्षण आपल्या डोळ्यात साठवून ठेवला.
पालक-शिक्षक सभा, शासनाच्या योजना, गुणदर्शनाचे कार्यक्रम अशा उपक्रमांसाठी अनेकदा पालक शाळेमध्ये येत असतात. प्रत्यक्ष उपक्रमात त्यांचा सहभाग नसतो. माणेकरी शाळेतील विद्यार्थ्यांचा पालक हा कामगार वर्गातील आहे. अनेक अडचणीतून ते आपल्या पालकांना शिकवतात. मुलांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागते. प्रसंगी पोटाला चिमटा काढून मुलांच्या शिक्षणासाठी ते खर्च करत असतात. या पालकांचे पूजन शाळेमध्ये झाल्याने पालकांना अश्रू अनावर झाले. आपण करत असलेल्या क ष्टाची पावती त्यांना आपल्या मुलांकडून मिळाल्याची भावना त्यांच्या मनात होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरुण गोगी होते. उपाध्यक्ष श्रीनिवास आडकी, सचिव लक्ष्मण पालमूर, भीमाशंकर आडकी, स्वाती गोगी, कालिदास माणेकरी, अशोक मांदवाद, रवींद्र चवडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. हिंदू जनजागृती समितीच्या सेविका राजश्री देशमुख, अलका व्हनमारे यांनी भारतीय संस्कृती या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. श्री सरस्वती व प्रार्थना या दोन पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका शारदा कुलकर्णी यांनी प्रस्तावनेतून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. अर्चना भंडे, अंबादास वल्लापोल्लू, मदिना नदाफ या पालकांनी या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कुलकर्णी यांनी केले. आभारप्रदर्शन शुभांगी नांदवटे यांनी केले.
आई-वडिलांच्या चरणात स्वर्ग- भारतीय संस्कृतीमध्ये आई-वडिलांना मानाचे स्थान आहे. मानवाच्या जीवनात प्रेमाची सुरुवात ही आईपासून होते. मुलांनी आयुष्यभर आई-वडिलांचे उपकार विसरु नये. आपल्या संस्कृतीमधील तत्त्वाप्रमाणे आपले जीवन व्यतीत करावे. मुलांवर चांगले संस्कार व्हावे, यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे आपल्या आई-वडिलांच्या चरणात स्वर्ग असल्याची भावना मुलांमध्ये आली. या उपक्रमात सुमारे ५०० विद्यार्थी तर २५० पालकांनी सहभाग घेतला होता.
पाच वर्षांपूर्वी व्हॅलेंटाईन डेला आई-वडिलांचे पूजन करावे, अशी संकल्पना मी मांडली. ही संकल्पना सर्वांनाच आवडली. तेव्हापासून दरवर्षी आमच्या शाळेमध्ये हा उपक्रम साजरा केला जातो. मुलांनी आई-वडिलांचे पूजन केले. तसेच पालकांना पुष्प भेट दिले. मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी हा उपक्रम आम्ही साजरा करतो.- संजय कुलकर्णी, शिक्षक