ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांचे वर्गात बसून मित्रांच्या सोबत दंगामस्ती करून शिक्षणाचे धडे गिरवणे कोरोना महामारीमुळे जवळ जवळ बंद झाले आहे. त्याला पर्याय म्हणून मागील वर्षापासून ऑनलाइन शिक्षण सुरू केले आहे. यात फायद्यापेक्षा तोटेच जास्त आहेत. ऑनलाइन शिक्षणामुळे घराबाहेर पडण्याची गरज नाही त्यामुळे वेळेची आणि पैशाची काही प्रमाणात बचत होते. घराबाहेर पडावे लागत नसल्याने लोकांचा संसर्ग येत नसल्याने कोरोनाच्या धोक्यातून मुलांचा जीव वाचला आहे. याचबरोबर ऑनलाइन शिक्षणामुळे शहरात मिळणारे शिक्षण खेड्यातील मुलांनाही मिळणे शक्य झाले आहे. याचबरोबर मुलांना मोबाइल व संगणक हाताळण्याचे ज्ञान प्राप्त झाले आहे. मुलांबरोबरच पालकही टेक्नोसॅव्ही झाले आहेत.
ऑनलाइन शिक्षणासाठी आवश्यक असणारे मोबाइल किंवा संगणक घेण्याची आर्थिक परिस्थिती नसणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. एकाच कुटुंबातील दोन तीन मुले शिक्षण घेत असतील तर प्रत्येकाला मोबाइल किंवा संगणक घेऊन देणे शक्य होत नाही. एकाच मोबाइलचा वापर करावा तर प्रत्येकाची वेळ वेगवेगळी असल्याने तेही शक्य होत नाही. त्यामुळे आर्थिक परिस्थिती नसलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे, अशा समस्या समोर येत आहेत.
ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांचा स्क्रीन टाइम वाढला आहे. त्यामुळे त्यांच्या डोळ्यांना त्रास होऊ शकतो. मोबाइलचा वापर वाढल्याने मुलांच्या इतर ॲक्टिव्हिटी कमी झाल्याने त्यांच्या शारीरिक क्षमतेवरही परिणाम होत आहेत. ऑनलाइन वर्ग चालू असताना कमी वयोगटातील मुलांबरोबर पालकांनाही थांबावे लागत असल्याने त्यांचाही वेळ वाया जात आहे. वर्गात ज्याप्रमाणे मित्र-मैत्रिणींना भेटता येते, आपले विचार शेअर करता येतात, एकत्र खेळता येते ते ऑनलाइन शिक्षणात करता येत नसल्याने मुले एकलकोंडी होण्याची भीती निर्माण झाल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
-----
ऑनलाइन शिक्षण आपल्यासाठी नवीन प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे शिक्षक, पालक व विद्यार्थी या सगळ्यांची जबाबदारी वाढली आहे. पालकांनी आता लहान वयोगटातील मुलांसाठी जास्तीत जास्त वेळ देण्याची गरज आहे. त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मदत करण्याची ही गरज आहे.
- डॉ. क्रिती चौधरी
प्राचार्य, सनराइज् इंग्लिश मीडियम स्कूल, टेंभूर्णी.
----
विद्यार्थी ऑनलाइन वर्गामध्ये जॉइन होतात; परंतु काही वेळातच बाहेर पडून ते मोबाइलवर गेम खेळत बसतात. याकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
- नारायण भानवसे, गणित शिक्षक, टेंभुर्णी
---
ऑनलाइन शिक्षणामुळे पालकांची जबाबदारी वाढली आहे. शिक्षकांनी पूर्ण तयारीनिशी शिकवले पाहिजे व आठवड्यातून एकदा होम व्हिजिट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला पाहिजे.
- सचिन होदाडे,
पालक
----
ऑनलाइन शिक्षणात मुलांचा वयोगट लक्षात घेऊन वेळापत्रक तयार करावे. लहान मुलांचा स्क्रीन टाइम जास्तीत जास्त दोन तासाचा असावा. त्यादृष्टीने वेळापत्रक तयार करावे. शिकवताना जास्तीत जास्त स्पष्टीकरण करणे ही गरजेचे आहे.
- ज्योती तुपे
पालक