सोलापूर: चांद्रयान-२ चे चंद्रावर ७ सप्टेंबर रोजी लँडिंग होणार आहे. या लँडिंगच्या वेळी बंगळुरू येथील ‘इस्रो’ केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थेट प्रेक्षपण पाहणार आहेत़ त्यांच्यासोबत विद्यार्थ्यांना थेट प्रक्षेपण पाहण्याची संधी मिळणार आहे. ही संधी ‘इस्रो’च्या वतीने मिळणार आहे़ यासाठी परीक्षा घेण्यात येणार असून, प्रत्येक राज्यातून दोन विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे.
इस्रोच्या वतीने आठवी ते दहावीमधील विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजूषेचे आयोजन करण्यात आले आहे़ ही प्रश्नमंजूषा आॅनलाईन पद्धतीने १० आॅगस्टपासून सुरू करण्यात आली आहे़ यामध्ये भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर नावनोंदणी करावी लागणार आहे़. या प्रश्नमंजूषेमध्ये उत्तम गुण मिळवणाºया प्रत्येक राज्यातील दोन विद्यार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत इस्रो बंगळुरू येथे पाहण्याची संधी मिळणार आहे.
या स्पर्धेची अंतिम तारीख २५ आॅगस्ट असणार आहे. इस्रोच्या वतीने २२ जुलै रोजी चांद्रयान-२ हे लॅडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञानसोबत प्रक्षेपित केले. हे यान ७ सप्टेंबर रोजी चंद्रावर पोहोचणे अपेक्षित आहे. चांद्रयानच्या लँडिंगनंतर लॅडर विक्रम दरवाजा उघडणार आहे. याबाबत शिक्षण विभागाकडून सर्व शाळांना पत्र देण्यात आले असून, यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी नावनोंदणी करून सहभागी व्हावे, असे आवाहन माध्यमिकचे शिक्षणाधिकारी सुनील शिखरे यांनी केले आहे़