सोलापूर : आई-वडिलांबरोबर भांडण करून दोन अल्पवयीन मुलांनी घर सोडलं. ती दोन मुलं बार्शी बसस्थानक परिसरात फिरत असल्याचे दिसले. नागरिकांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी तात्काळ बसस्थानकात दाखल झाले. दोन मुलांना ताब्यात घेतले. विश्वासात घेऊन विचारपूस अन् चौकशी केली. चौकशीत आई-वडिलांबरोबर भांडण झाल्याने आम्ही घर सोडून जात असल्याचे अल्पवयीन मुलांनी सांगितले. पोलिसांनी त्या मुलांचे समुपदेशन केले. मुलांच्या आई-वडिलांना बार्शीला बोलावून घेतले अन् सुखरूपपणे स्वाधीन केले.
याबाबत पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की, सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास बार्शी शहरातील एस.टी.स्टॅड येथे दोन अल्पवयीन मुले फिरत असल्याबाबतची बातमी मिळाल्याने बार्शी शहर पोलीस ठाणेकडील अंमलदार पो.ना.अमोल माने, सचिनदेशमुख, अविरत बरबडे यांनी एस.टी. स्टॅड येथे जावुन चौकशी केली असता समाधान सरवदे (वय ११ वर्ष), सोहम विशाल मिरवणे (वय.०८ वर्ष दोघे रा.तेरखेडा जि.धाराशिव) ही दोन अल्पवयीन मुले मिळून आली. पोलिसांनी विचारले असता आम्ही आई वडिलांबरोबर भांडण झाल्याने रागाच्या भरात कोणास काही न सांगता सकाळी एस.टी.ने. तेरखेडा येथून पुणे येथे जाण्यासाठी बार्शी येथे आल्याचे सांगितले.
दरम्यान, पोलिसांनी एसटी वाहकासोबत त्या मुलांना बालस्नेही कक्षामध्ये आणून पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, स.पो.नि.ज्ञानेश्वर उदार यांनी मुलांचे समुपदेशन केले. त्यानंतर आम्ही या पुढे आई -वडिलांना न सांगता बाहेरगावी कोठेही जाणार नसल्याचे मुलांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी मुलांच्या पालकांना संपर्क साधून बोलावून घेतले व त्यांना सुरक्षित पालकांच्या ताब्यात दिल्याचे पोलिसांनी सांगितले.