- विलास जळकोटकर
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील फताटेवाडी... जवळच बंजारा तांडा... २५५ उंबºयाचा तांडा.. लोकवस्ती इनमिन १३३० पण इथल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेनं शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहोचवण्याचं काम चालवलं आहे. मराठी माध्यमाच्या शाळेतली मुलं हिंदी, इंग्रजीतून खडाखडा भाषण करतात.
मोलमजुरी करून पोटभर अन्नासाठी कष्ट सोसणारी वस्ती; मात्र पालकांनी जिद्दीनं शिकवलं अन् मुलांना पोलीस व इतर खात्यात नोकरदार जादा असलेलं गाव अशी ओळख केली.
इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंतच्या शाळेत तिघे गुरुजन विविध कौशल्ये, भौतिक सुविधांसाठी प्रयत्नशील आहेत. गुणवत्ता वाढीसाठी इंग्रजी, मराठी व गणित पेटीचा जास्तीत जास्त वापर करून मुलांना स्वयंअध्ययनासाठी प्रेरित केले जाते. सकाळी ९.१५ वा. विद्यार्थी शाळेत येतात. स्वयंपाकीण ललिता राठोड स्वत: अभ्यासासाठी उद्युक्त करतात. वाचनाचे वेड मुलांना यामुळेच लागले. स्पिकरवर ‘परिपाठ’ विद्यार्थी प्रभावीपणे स्वत:च घेतात. २ री, ३ रीतील काही विद्यार्थी ३० ते ४० अंकी संख्यांचा गुणाकार, भागाकार अचूक करतात. निर्भीडपणे तोंडी उत्तरे देऊन संवाद साधतात.
लोकसहभाग आणि जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मुलांना संगणक, लॅपटॉप यासह नव्या तंत्रज्ञानाच्या सर्व बाबी उपलब्ध आहेत. तंत्रज्ञानाचा भरपूर वापर यामुळेच अध्ययनात केला जातो. स्वत: विद्यार्थी संगणकाचा वापर करतात. १९ खडीचा विशेष वापर अध्ययनात केला जातो.
विषयमित्र, आनंददायी शिक्षण, विद्यार्थ्यांशी सुसंवाद, आव्हानात्मक प्रश्न, उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना अध्ययनास प्रवृत्त केले जाते. हे सर्व आनंददायी शिक्षणपद्धतीमुळे केले जात असल्यामुळे मुलं शाळेमध्येच अधिक रमत असल्याचं दिसून आलं.
मुलांसाठी आम्ही हे करतोमराठी शाळा असून हिंंदी, इंग्रजीतून विद्यार्थी भाषणे अस्खलित करतात. संवाद साधतात. ‘मित्रा’ उपक्रम, योगासने, मानवी मनोरे, कवायती शाळेत नियमितपणे घेतली जातात. कडक शिस्तीमुळे विद्यार्थी शाळेत रमून जातात. सफाई, शिस्त, गुणवत्तेमुळे आसपासच्या खासगी व इंग्रजी शाळेतील १३ विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेतला. वाबळेवाडीची (ता. शिक्रापूर) आंतरराष्टÑीय शाळा पाहून सर्व शिक्षक प्रभावित झाले. तेथून प्रेरणा घेऊन जास्तीत जास्त सोयी-सुविधा देण्याचा प्रयत्न चालवला. यामुळेच शैक्षणिक, सांस्कृतिक स्पर्धांमध्येही विद्यार्थी चमकताहेत. अनेक पुरस्कार शाळेला मिळाले आहेत.
गुणवत्तापूर्ण, सुसंस्कारित विद्यार्थी घडविण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केला जातो. विषयमित्र, जॉयफूल लर्निंग, स्पर्धा परीक्षा तयारी, तंत्रज्ञानाच्या मदतीने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न पालकांच्या सहकार्याने करत आहोत.- प्रमोद कस्तुरे, मुख्याध्यापक
कडक शिस्त,आनंददायी शिक्षण, विविध उपक्रम यामुळे विद्यार्थी शाळेकडे आकर्षिले जात आहेत. पालक, कल्पक शिक्षकांच्या सहकार्याने निश्चितपणे शाळा प्रगतीपथावर जाईल.- किशोर चव्हाण (नाईक)
लोकसहभागाचा ओघशाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी ग्रामस्थांनी तब्बल अडीच लाखांची देणगी दिली. डीएड झालेल्या शीतल चव्हाण स्वत:हून शाळेत विनामोबदला अध्ययन करतात. शाळा आपलीच आणि मुलं आपलीच या भावनेतून प्रत्येकजण शाळेसाठी आपला खारीचा वाटा उचलतो हे उल्लेखनीय आहे.