सोलापूर : मुलाची डीएनए टेस्ट करण्यास लावून बदनामी केल्याप्रकरणी मातेने सासरच्या मंडळींविरुद्ध दिवाणी न्यायाधीश ए. ए. कुलकर्णी यांच्या न्यायालयात ३० कोटींचा दावा दाखल केला आहे.
विजापूर रोड भागातील पीडित महिलेचा १ एप्रिल २००१ रोजी उमेश नारायण भावसार याच्याशी लग्न झाले होते. लग्नानंतर उन्मेश या मुलाचा जन्म झाला होता. सध्या हा मुलगा १६ वर्षांचा आहे. पती व सासरकडील मंडळी दीर डॉ. संजय भावसार, जाऊ डॉ. सुनीता भावसार, सासू लता या सर्वांनी हुंड्यासाठी छळ करून विवाहितेस हकलून दिले. पीडित महिलेने कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात गुन्हा दाखल केला होता.
सासरच्या मंडळींनी मुलगा पती-पत्नीच्या संबंधातून झाला नाही असा आरोप केला होता. न्यायालयामार्फत पीडित महिला व मुलगा उन्मेश व पती उमेश यांची डीएनए टेस्ट पुणे येथील फॉरेन्सिक रिसर्च सेंटर येथे करण्यासाठी पाठवण्यात आले होते. लॅबचा रिपोर्ट येऊन मुलगा उन्मेश हा पीडित पत्नी मालिनी व पती उमेश यांच्यापासून झालेला आहे असा अहवाल आला. दरम्यान पती व सासरच्या मंडळींनी डीएनए तपासणीची बातमी सर्वांना सांगितली होती. यामुळे महिलेची व लहान मुलाची बदनामी झाली.
यावर चर्चा होऊन समाजात फिरणे कठीण झाले. पीडित महिला व मुलास समाजात फिरताना संशयाच्या नजरेने पाहू लागले. या प्रकरणात खोट्यापणाने डीएनएचा अर्ज दिल्याने पीडित महिलेस मानसिक व शारिरीक त्रास झाला. या प्रकारामुळे पीडित महिलेने अॅड. श्रीनिवास कटकुर व अॅड. किरण कटकुर यांच्यामार्फत सासरच्या मंडळींविरूद्ध ३० कोटींचा गुन्हा दाखल केला आहे. असा दावा दाखल होण्याची सोलापूरच्या इतिहासातील पहिली घटना आहे.
बदनामीचा आरोप...- पती व सासरच्या मंडळींनी डीएनए तपासणीची बातमी सर्वांना सांगितली होती. यामुळे महिलेची व लहान मुलाची बदनामी झाली. यावर चर्चा होऊन समाजात फिरणे कठीण झाल्याचा आरोप फिर्यादी महिलेने सासरच्या मंडळींविरुद्ध केला आहे.