उत्तर सोलापूर : कष्ट, जिद्द, शेतीतल्या थोरामोठ्यांचं मार्गदर्शन आणि लागवडीनंतर थेट व्यापाऱ्यांशी संपर्क साधल्यामुळे मार्केटिंगचा सूर गवसलेल्या पडसाळीच्या ग्रामस्थांनी यंदा ४००हून अधिक एकरावर सिमला मिरचीची लागवड केली आहे. पडसाळीची ओळख आता मिरचीचं गाव अशी झाली आहे.
वीज, पाणी या मूलभूत सुविधांची अडचण असलेल्या पडसाळी गावातील शेतकऱ्यांचे जिद्द, कष्ट व मार्केटिंग वाखाणण्याजोगे आहे. यामुळेच गेल्यावर्षी सुमारे ३०० एकरांवर सिमला मिरचीची लागवड झाली होती. यंदा त्यात १०० एकराहून अधिक क्षेत्रावार लागवड झाली आहे. गतवर्षी प्रामुख्याने गुजरात तसेच इतर राज्यांतही मिरचीला मार्केट मिळाले होते. गावातील काहींनी पुढाकार घेऊन थेट व्यापाऱ्यांशी संपर्क ठेवला होता. त्यामुळे जागेवर दर ठरवून मिरची तोडणी व्हायची. याचा शेतकऱ्यांंना चांगला फायदा झाला.
गेल्या चार- पाच वर्षांपासून मार्केटिंगचा सूर गवसलेल्या पडसाळीत यावर्षी १५ मेपासून मल्चिंगवर मिरची लागवड सुरू झाली. ती आतापर्यंतच्या साधारण ४२५ एकर इतकी झाली असल्याचे सांगण्यात आले. तसेच या गावाला शेतीसाठी बारमाही पाण्याची सोय नाही. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतीसाठी पुरेसा वीज पुरवठाही होत नाही. वीज व पाण्याची पुरेशी सोय नसलेल्या पडसाळीकरांची जिद्द मात्र मोठी आहे.
----
सूर गवसला
चार- पाच वर्षांपासून मार्केटिंगचा सूर गवसलेल्या पडसाळीत सात-आठ वर्षांखाली प्रशांत भोसले या शेतकऱ्याने सिमला मिरचीची लागवड केली. आज गावातील संपूर्ण शेतकरी मिरचीचे उत्पादन घेतात. मागील वर्षी एक रुपया २० पैसे दराने मिरचीचे रोप मिळत होते. यावर्षी दोन रुपयांनीही रोप उपलब्ध झाले नसल्याचे सांगण्यात आले.
शबरीची बोरे ते मिरची..
स्वर्गीय ज्योतीराम गायकवाड यांनी प्रथम घेतलेल्या शबरी बोराचा प्रयोग यशस्वी झाला होता. त्यानंतर मागील सात वर्षांपासून सिमला मिरचीची लागवड यशस्वी झाली आहे. आता पडसाळी भोवतालच्या कळमण, रानमसले, खुनेश्वर या गावांतही मिरची लागवड वाढली आहे.
फोटो : ३० उत्तर सोलापूर १
मार्केटिंगचा सूर सापडलेल्या पडसाळीत मिरचीची लागवड.
----