टेंभुर्णी : वैरण घेऊन घराकडे निघालेला छोटा हत्ती टेम्पो उजनी कॅनलमध्ये पडून पित्यासह सात वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
तात्यासाहेब बाळासाहेब कोळी (वय २८, रा. मिटकलवाडी) आणि चिमुकली आरती (वय ७) कोळी असे मरण पावलेल्या पिता आणि मुलीचे नाव असून माढा तालुक्यातील माळेगाव हद्दीत रविवारी सकाळी ९.३० वाजता ही घटना घडली.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार तात्यासाहेब कोळी हे सध्या माळेगाव येथे राहातात, ते रविवारी सकाळी ९.३०च्या सुमारास खुरपणी कामावर जाणाऱ्या महिला मजुरांना शेतात सोडून एका मालवाहू टेम्पो (एम.एच. ४५, ०३१२) मधून जनावरांसाठी वैरण घेऊन निघाले. ते स्वत:चे वाहन स्वत: चालवत मिटकलवाडी-माळेगाव उजनी कॅनल पट्टीवरून माळेगावकडे निघाले होते. सोबत स्वत:च्या सात वर्षीय मुलीला घेऊन निघालेले होते. कॅनलच्या एका वळणावर टेम्पो पलटी झाला. पाण्याने वाहत असलेल्या कॅनलमध्ये पडला. वाहते पाणी मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही. याठिकाणी लोकांची वर्दळही नसल्याने पाण्यात पडलेला टेम्पो कोणाच्या निदर्शनास लवकर आले नाही.
सकाळी १०.३० वाजता वीज आली आणि काही शेतकरी मोटार चालू करण्यासाठी शेताकडे निघाले. त्यांना टेम्पो पाण्यात पडल्याचे लक्षात आले. यानंतर नातेवाईक व लोकांनी क्रेनच्या साह्याने टेम्पो बाहेर काढला. तात्यासाहेब व मुलगी आरती मृतावस्थेत आढळून आले.
याबाबत नागनाथ भिकाजी कोळी यांनी टेंभुर्णी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक काझी करीत आहेत.
--
पत्नीसह आई-वडील झाले पोरके
तात्यासाहेब कोळी हे मूळचे मिटकलवाडी येथील रहिवासी आहेत. सध्या ते माळेगाव येथे कुटुंबासह मोलमजुरी करून गुजराण करतात. ते आई-वडिलांना एकुलते एक होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील व दोन मुली असा परिवार आहे.
---
फोटो : २४ टेंभुर्णी अक्सिडेंट
अखेरचा फोटो ...वैरण आणायला जाण्यापूर्वी तात्यासाहेब कोळी आणि चिमुकली आरती यांनी घेतलेला फोटो शेवटचा ठरला.