गादेगाव (ता. पंढरपूर) येथील पोपट बागल यांच्या खडी क्रशरवर मोलमजुरी करणाऱ्या राणी हिंमत कुंभार (वय २५) यांना २ जून रोजी त्रास जाणवू लागल्यानंतर गादेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रॅपिड टेस्ट केली. यानंतर त्यांची दोन वर्षीय मुलगी ऋषाली कुंभार हिचीही कोरोना टेस्ट केली. यामध्ये माय-लेकी दोघीही पाॅझिटिव्ह आढळल्या. आरोग्य केंद्रातील सेवकांनी तत्कळ कोविड केअर सेंटरला कळवून त्यांना ॲडमिट करून घेतले व त्यांच्यावर गावातील मोफत कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू केले. वेळेत व लवकर उपचार मिळाल्याने माय-लेकी दोघींनीही कोरोनावर मात केली असल्याची माहिती कोविड केअर सेंटरचे सचिव गणेश बागल यांनी दिली.
गादेगाव येथे हे कोविड सेंटर चालवले जाते. यासाठी डाॅ. बालाजी शिंदे, डाॅ. अमित गंगथडे, डाॅ. अण्णासाहेब बागल, वैद्यकीय अधिकारी डाॅ. अनिशा तांबोळी, आरोग्य सेवक, सेविका, आशा सेविका, आरोग्य सेविका प्रज्ञा कांबळे, ग्रामसेवक जयंत खंडागळे, तलाठी समीर पटेल, श्रीकांत कदम यांचे सहकार्य लाभले. तर अध्यक्ष दत्ता बागल, उपाध्यक्ष अनिल बागल, कार्याध्यक्ष गणपत मोरे, सचिव गणेश महादेव बागल, सरपंच ज्योती बाबर, तानाजी बागल, स्वागत फाटे, संदीप कळसुले, आजिनाथ बागल आदी कोविड सेंटरचे काम पाहतात.
----
८२ रुग्ण बरे होऊ घरी परतले
गादेगाव येथील कोविड सेंटरमध्ये सकाळी दोन अंडी, नाश्ता, चहा व चारनंतर चहा बिस्किट, ज्यांच्या जेवणाची सोय नाही, अशांना जेवणही दिले जाते. आजपर्यंत ८२ रुग्ण बरे करून घरी पाठविले आहेत. आजही १० रुग्ण येथे उपचार घेत आहेत. गावातील रुग्णसंख्या जोपर्यंत शून्य होत नाही तोपर्यंत हे कोविड केअर सेंटर चालवण्यात येणार असल्याचे सेंटरचे अध्यक्ष दत्ता बागल यांनी सांगितले.
---
दोन वर्षीय ऋषाली व तिच्या आईची कोरोनातून मुक्ती झाल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र देऊन घरी सोडताना अध्यक्ष दत्ता बागल, सचिव गणेश बागल, गणपत मोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिशा तांबोळी आदी.