पंढरपूर तालुक्यातील चिंचणी हे एक हजारच्या आसपास लोकसंख्येच गाव. पुनर्वसित असलेले हे गाव एकीच्या बळावर पर्यावरण संतुलन राहणारे गाव म्हणून राज्यभर परिचित आहे. या गावाने गेल्या २० वर्षांत विविध प्रकारची तब्बल सात हजारांपेक्षा जास्त झाडे लावून त्याचे यशस्वी संगोपन केले आहे. सध्या रुग्णांना ऑक्सिजन मिळत नसल्याने अनेकजण दगावत आहेत. मात्र, या गावाचे चित्र वेगळे आहे.
लावलेल्या झाडांमुळे याठिकाणी असलेला निसर्गरम्य परिसर, मुबलक ऑक्सिजनमुळे गावातील लहानथोर नागरिकांची प्रकृती कायम उत्तम असते. प्रशासनाने घालून दिलेले नियम या गावाने तंतोतंत पाळले आहेत. नियमित सॅनिटायझर, मास्कचा वापर करणे, गावातून एखादा व्यक्ती बाहेर गेल्यास त्याने पाळावयाचे नियम, त्याने गावात परत येताना घेण्यात येत असलेल्या खबरदाऱ्यांमुळे कोरोनाला वेशीवर रोखण्यात आम्ही यशस्वी ठरत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
संशयित रुग्ण शोधून उपचार
चिंचणीत गेल्या वर्षभरात कोरोनाची संभाव्य लक्षणे असलेल्या सर्दी, खोकला, ताप आदी लक्षणे ग्रामस्थांना किरकोळ स्वरूपात जाणवू लागली तरी ग्रामस्थांकडून तपासण्या करुन घेतल्या जातात. त्यामुळे तो रुग्ण बाधित होण्यापासून वाचत आहे. प्रशासनाने दिलेले विलगीकरण, सॅनिटायझरिंग, मास्कचे नियम ग्रामस्थ तंतोतंत पाळत आहेत. त्यामुळेच गावात आजपर्यंत रुग्ण सापडला नाही.
आमच्या गावाने एकीच्या बळावर अनेक महत्त्वाची कामे केली आहेत. त्यामुळे कोरोनालाही हरविण्यात आम्ही यशस्वी झालो. गावात कोरोनाबाधित रुग्ण होऊ द्यायचा नाही, यासाठी आमचा प्रयत्न आहे. गावातून बाहेर कोण जात नाही, बाहेरून कोण येत नाही. महत्त्वाच्या कामासाठी कोण गेले, आले तर ठरवून दिलेले लहानथोर वृद्ध सर्वजण नियम पाळतात. त्यामुळेच हे शक्य झाले आहे.
- मोहन अनपट, चिंचणी, ता. पंढरपूर
०६चिंचणी ०१ ते ०९
चिंचणी (ता. पंढरपूर) येथे करण्यात आलेली वृक्ष लागवड.