चालू वर्षी मान्सूनपूर्व पावसासह मृग, आर्द्रा, पुनर्वसू व पुष्य नक्षत्रातील पावसाने समाधानकारक हजेरी लावली. त्यामुळे तालुक्यात शेतकरी सुखावला आहे. गतवर्षी परतीच्या पावसापूर्वी नीरा उजवा कालव्यातून चिंचोली तलावात पाणी सोडले. त्यानंतर परतीच्या मुसळधार पावसामुळे चिंचोली तलाव १०० टक्के भरल्याने सांडव्यावरून पाणी वाहिले होते. त्यामुळे उन्हाळ्यात चिंचोली लाभक्षेत्रातील शेती व जनावरांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागले नाही.
सांडव्यावरून वाहू लागले पाणी
पावसाळ्यापूर्वी आ. शहाजीबापू पाटील यांनी उन्हाळी आवर्तनातून नीरा उजवा कालव्यातून तालुक्यातील सर्व तलाव, बंधारे पाणी सोडून भरून देण्याच्या सूचना नीरा उजवा कालवा कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग फलटण यांना केल्या होत्या. त्यानुसार नीरा उजवा कालव्यातून सोडलेल्या ७० टक्के पाण्यातून तर चिंचोली तलावाच्या लाभक्षेत्रात सतत पडणाऱ्या पावसामुळे ३० टक्के पाण्यातून सलग तिसऱ्या वर्षी चिंचोली तलाव १०० टक्के भरल्याने सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे.
ओढ्यावरील बंधारेही झाले ओव्हरफ्लो
सांगोला शहर व परिसरातील नागरिक चिंचोली तलावाला आवर्जून भेट देत वाहणाऱ्या पाण्याचा आनंद लुटत आहेत. या पाण्यातून तलावाच्या पूर्व बाजूकडील ओढ्यावर असणारे सर्व बंधारे ओव्हरफ्लो झाल्याने त्यातूनही पाणी वाहत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
९२.२७ द.ल.घ.फू. पाणीसाठा
चिंचोली तलाव १०० टक्के भरल्याने तलावाच्या लाभक्षेत्राद्वारे ओलिताखाली येणाऱ्या एखतपूर, सांगोला (बिलेवाडी), बामणी, चिंचोली येथील १८०० एकर शेती व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. सध्या तलावात ९२.२७ द.ल.घ.फू. पाणीसाठा तयार झाल्याने सांडव्यावरून पाणी वाहत आहे.
फोटो ओळ :::::::::::::
चिंचोली तलाव सलग तिसऱ्या वर्षी १०० टक्के भरून सांडव्यावरून पाणी वाहत आहे.