सोलापूर : जिल्ह्यातील उद्योग-व्यवसायांनासोलापूर आता अधिक अनुकूल झाले आहे. शासनाच्या आदेशानुसार चिंचोळी एमआयडीसीचा संपूर्ण भाग आता डी प्लसमध्ये वर्गीकृत करण्यात आला आहे. यामुळे उद्योगांना ६० टक्के सबसिडी मिळणार आहे.
चिंचोळी एमआयडीसी ही उत्तर सोलापूर व मोहोळ या दोन तालुक्यांत विभागली गेली होती. उत्तर सोलापुरातील उद्योग हे ‘डी,’ तर चिंचोळीमधील (मोहोळ) उद्योग हे डी प्लसमध्ये वर्गीकृत करण्यात आले होते. यामुळे दोन्हीकडील उद्योगांना मिळणारी सबसिडी ही वेगळी होती. शासनाच्या धोरणानुसार डी प्लसमधील उद्योगांना सर्वांत जास्त सबसिडी मिळते. आता चिंचोळी एमआयडीसीमधील सर्व उद्योगांना याचा लाभ मिळणार आहे.
डी प्लसमधील उद्योगांना ६० टक्के सवलत ही दरवर्षी सहा टक्क्यांप्रमाणे दहा वर्षांत ६० टक्के मिळते. डी प्लसमधील उद्योगांना स्टॅम्प ड्यूटीमध्येही सवलत मिळते. यासोबतच टेक्सटाईल, शेतीसंबंधित उद्योगांसाठी डी प्लस एमआयडीसी ही अधिक फायदेशीर ठरणार आहे. जे उद्योग आयएसओ मान्यता मिळवतात, त्यांनाही शासनाकडून अधिक परतावा मिळतो.
-------
पुणे, औरंगाबादमधील उद्योग होतील डायव्हर्ट
चिंचोळी एमआयडीसी ही पूर्ण डी प्लसमध्ये गेली आहे. याचा फायदा हा नव्या उद्योगांना होणार आहे. त्यामुळे पुणे, औरंगाबादमधील उद्योग सोलापुरात डायव्हर्ट होण्याचा विचार करतील. सोलापुरातून मोठ्या शहरात जाण्यासाठी चांगली सुविधा आहे. याचा फायदा घेण्यासाठी अनेक उद्योग उत्सुक होतील, असा विश्वास उद्योजकांनी व्यक्त केला.
शासनाने २०१९ मध्ये सामूहिक प्रोत्साहन योजना जाहीर केले होती. तेव्हापासून चिंचोळी एमआयडीसीमधील सर्व उद्योग हे डी प्लसमध्ये वर्गीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. त्याला आता यश आले असून भविष्यात सोलापुरात अधिक उद्योग येण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा असणार आहे.
- वासुदेव बंग, उद्योजक
-------
महाराष्ट्रात डी प्लसमध्ये असणाऱ्या उद्योगांना सर्वांत जास्त सबसिडी मिळते. एमआयडीसीचा एक भाग हा डी प्लसमधील सुविधांपासून वंचित होता. त्यांना हा लाभ मिळेल तसेच नव्या उद्योगांसाठीही चांगली संधी असणार आहे.
- संगमेश अरळी, व्यवस्थापक, सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशन
---------