कामती : मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर टोल नाक्यावर चारचाकी वाहनाला अडवून मदतीच्या बहाण्याने दोघे जण गाडीत बसले. मोहोळमार्गे ढोकबाभूळगाव पाटी हद्दीत आले असता चालकास मारहाण करून वाहन, पैसे व मोबाइल घेऊन पळून जाणाऱ्या दोघांना कामती पोलिसांनी सिनेस्टाइलने पाठलाग करून पकडले.
चोर- पोलिसांतील हा थरार सावळेश्वर- मोहोळ- कामती- शिंगोली या रस्त्यावर घडला.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार सावळेश्वर येथे एमएच-०१, सीजे-५६३९ या वाहनात बसलेले दोघे जण ढोकबाभूळगाव पाटी येथे येताच चालकास मारहाण करून रोख रक्कम, मोबाइलसह त्याच्या ताब्यातील वाहन काढून घेतले. त्याला गाडीतून खाली उतरवून लावत त्याचे वाहन पळवून नेले.
घाबरून जाऊन चालकाने येथील आनंद कुचेकर (रा. सय्यद वीरवडे, ता. मोहळ) यांना घटनेची माहिती दिली. त्यांनी कामती पोलीस ठाण्यात याची माहिती दिली. कामती पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी शिवाजी चौकात नाकाबंदी केली. यावेळी चोरट्यांनी वाहन न थांबवता ते तसेच दामटत नेत पोलिसांना हुलकावणी दिली. पोलीस नाईक परमेश्वर जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल यशवंत कोटमळे, सचिन जाधवर, राम कासले, सुनील पवार, जगन इंगळे यांनी शिंगोली (ता. मोहोळ)पर्यंत वाहनाचा पाठलाग केला.
पुढे चोरट्यांना रस्त्याचा अंदाज न आल्याने त्यांनी त्यांच्या ताब्यातील वाहन रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात पलटी केले. त्यानंतर हे चोरटे बाहेर पडून पळत सुटले. पोलिसांनी पुन्हा सिनेस्टाइलने पाठलाग करून त्याला पकडले.
कामती पोलिसांनी प्रेम हलकवडे (वय १७, रा. देगाव नाका, सोलापूर) व यशपाल गायकवाड (वय १९, रा. मुकुंदनगर, भवानी पेठ, सोलापूर) या दोघांना पकडून मोहोळ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. मोहोळ पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास एएसआय सुनील चवरे करीत आहेत.