सोलापूर : चित्रपट रसिकांना चंदेरी दुनियेत घेऊन जाणारे, दर आठवड्याला प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाचे साक्षीदार.. पहिला शुक्रवार पहिला शो सुरू करण्यासाठी मोलाची भूमिका बजावून रसिकाला तिकिटे देणारे हात आज घर रंगवत आहेत... तर कुणी भाजी विकत आहेत. मागील सव्वा वर्षापासून थिएटर बंद असल्याने अनेकांना रोजगाराला मुकावे लागले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सरकारतर्फे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. शहरातील सगळेच व्यवहार बंद झाले आणि आता सुरु झाले सुद्धा पण थिएटर अजूनही सुरु झालेले नाही. थिएटर चालविणाऱ्या कंपन्यांनीही कर्मचाऱ्यांना दुसरा व्यवसाय-नोकरी करण्याचा सल्ला दिला. शेवटचा पगारही अर्धाच दिला.
थिएटर बंद असल्याने सुमित जाधव हे आठ महिने घरी बसूनच होते. काम नसल्यामुळे पीएफ काढून काही दिवस घर चालवले. तेवढ्या वेळात दुसरीकडे नोकरी शोधली. आता एका शोरुममध्ये काम करत आहे. सुमित जाधव यांच्यासारखे अनेक जण दुसऱ्या व्यवसायात आहेत. गणेश तळभंडारे हे घर रंगविण्याचे काम करत आहेत. आता पावसास सुरुवात झाल्याने तेही काम बंद आहे.
लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर थिएटर सुरु होणार नसल्याचे आम्हाला सांगण्यात आले. मी अजूनही नोकरीच्या शोधात आहे. तर आमच्या सहकाऱ्यांपैकी कुणी शेती करतोय तर कुणी रिक्षा चालवत आहे.
- राहुल बनसोडे
-------
मागील बारा वर्षांपासून मी थिएटरमध्ये काम करत होतो. या नोकरीवरच मी आणि माझे कुटुंबीय अवलंबून असताना थिएटर बंद झाले. काही दिवस एमआयडीसीमध्ये काम केले. पण, वेतन परवडत नसल्याने आता भाजी विक्री करतोय.
- दत्ता गवळी
पीएफ काढले... संपलेही...
अचानक हातची नोकरी गेल्याने अनेकांसमोर आर्थिक अडचणी आल्या होत्या. लॉकडाऊनमुळे दुसरीकडे काम मिळत नव्हते. भविष्याच्या तरतुदीसाठी असलेला पीएफ काढला. काही दिवसात तोही संपला. त्यामुळे आता त्याचाही आधार नाही. कंपनीने कुठलीही आर्थिक मदत केली नाही, रुग्णालयाच्या खर्चाबद्दल विचारणा केली नसल्याची खंत थिएटरमधील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.