कोरोना महामारी ग्रामीण भागात घुसली असली तरीही नागरिकांमध्ये बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. मात्र यात होणारे मृत्यू व दवाखान्यासाठी होणारा खर्च यामुळे ग्रामीण भागाला मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे मागीलवर्षी खबरदारी घेतलेल्या तुलनेत यावर्षी ग्रामस्थ निष्काळजी दिसत आहेत. शहरातून येणारे अनेक नागरिक बिनधास्त गावात फिरत आहेत. याशिवाय ग्राम समित्या व स्थानिक प्रशासन बहुतांश गावात निर्धास्त काम करीत आहे. त्यामुळे ही परिस्थिती सावरण्यासाठी गावकऱ्यांना पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
केअर सेंटरची संकल्पना
ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत. यासाठी गावात जास्तीत जास्त टेस्ट वाढविण्याची गरज आहे. गावकऱ्यांच्या मदतीने तरुणांनी पुढे येऊन कोविड केअर सेंटर उभारण्याची आवश्यकता आहे. याशिवाय ग्रामस्थांनी प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करण्याची आवश्यकता आहे, असे भांबुर्डीचे सरपंच दादासाहेब वाघमोडे यांनी सांगितले.