बोहाळी येथे दोन दिवसांपूर्वी एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्यानंतर त्याला कोविड रुग्णालयात जाण्याच्या सूचना देऊनही तो रुग्ण घरीच उपचार घेत होता. सोमवारी उपचारासाठी पंढरपूरला नेताना त्याचा मृत्यू झाला. मात्र मयताच्या नातेवाइकांनी कोणालाही खबर न देता अंत्यविधी परस्पर उरकला होता. ही माहिती उघड झाल्यानंतर गावात खळबळ उडाली.
याबाबतची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष भास्कर कसगावडे यांनी प्रशासनाला दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी प्रांताधिकारी सचिन ढोले, पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावात स्वतंत्र आढावा बैठक घेत झालेल्या प्रकाराची माहिती घेतली.
या आढावा बैठकीत सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य सेवक, पोलीस पाटील, कोतवाल, आशा सेविका, शिक्षक आदी महत्त्वाच्या कर्मचारी व ग्रामस्थांसोबत बैठक घेऊन मयत झालेल्या नागरिकाच्या आजूबाजूच्या परिसराची माहिती घेतली. या परिसरातील नागरिकांच्या चाचण्या आधीच घेतल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. तर उर्वरित राहिलेल्या नागरिकांच्या चाचण्या घ्या. आवश्यक औषध पुरवठा आहे का? कमी कर्मचाऱ्यांचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर वाढीव कर्मचारी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही प्रांताधिकाऱ्यांनी दिले.
कसल्याही परिस्थितीत या परिसरात पुन्हा रुग्ण वाढू नयेत, यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्या, वरिष्ठांकडून आवश्यक मदत देण्यात येईल. त्या परिसरातील काही नागरिक प्रशासनाला कोविड संदर्भात सहकार्य करत नसतील तर त्यांची नावे प्रशासनाला कळवावीत, त्यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल केले जातील. प्रशासनाने घालून दिलेले नियम पाळावेत, कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन प्रांताधिकाऱ्यांनी केले.
या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष भास्कर कसगावडे, सरपंच शिवाजी पवार, उपसरपंच जगन्नाथ जाधव, राजेश कुसुमडे, कल्याण कुसुमडे, दत्ता जाधव, आकाश चंदनशिवे, संजय कुंभार, पोलीस पाटील मनोज माने, जालिंदर कुसुमडे, तलाठी विष्णू व्यवहारे, विक्रम चंदनशिवे, ग्रामसेवक कृष्णा डोके, आरोग्य सेवक महेश जेठे, अंगणवाडी सेविका सुरेखा चंदनशिवे, सुरेखा झेंडे, बाजीराव धुमाळ, हरी माने आदी उपस्थित होते.
बोहाळीत पुन्हा तीन रुग्ण आढळले
बोहाळी परिसरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. सोमवारी कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा परस्पर अंत्यविधी केल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रशासनाच्या सूचनेनुसार त्याच परिसरात काही नव्याने चाचण्या घेण्यात आल्या. त्या वेळी पुन्हा नवीन तीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर इतर गावावरून चाचणीसाठी आलेले दोन रुग्ण असे पाच रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचा सिलसिला किती दिवस सुरू राहणार हे पाहावे लागणार आहे.
फोटो ओळ ::::::::::::::::
बोहाळी येथे कोरोना आढावा बैठकीत माहिती देताना प्रांताधिकारी सचिन ढोले व उपस्थित कर्मचारी.