सोलापूर : नायब तहसिलदार असल्याची बतावणी करत कमी दरात शासकीय जागा मिळवून देतो असे सांगून अनिवासी भारतीय नागरिकाची चार कोटी रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत श्रीशैलकुमार बसवण्णाप्पा हादीमणी ( वय ५५, रा. जॉर्जिया, अमेरीका, मुळ. जेऊरगी रोड, कलबुर्गी, कर्नाटक) यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून मुख्य आरोपी मनोज अश्रुबा गोडबोले ( वय ५५ ) याच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी हादीमणी यांची २०१८ मध्ये आरोपी मनोज गोडबोले यांच्याशी झाली. त्यावेळी आरोपी गोडबोले याने आपण नायब तहसिलदार असून मंगळवेढा येथे कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. शासकीय जमिनी कमी दरात कायदेशीर तुम्हाला मिळवून देतो असे त्यांने सांगितले. त्यानंतर त्याने विजापूर रोड जवळील २ हेक्टर जागा दाखवत ही जागा शासकीय असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने पुणे मधील हडपसर येथील जागा असल्याचे सांगत तेथील जागा मिळवून देण्याचे सांगत फिर्यादीकडून वेळोवेळी चार कोटी शंभर रूपये घेत त्यांची फसवणूक केली.
या प्रकरणी मुख्य आरोपी मनोज अश्रुबा गोडबोले, राधा मनोज गोडबोले, यश मनोज गोडबोले ( सर्व रा. नालंदा नगर, आरटीओ ऑफीस जवळ), आदिती पांडुरंग गोसावी, सानिका अभय उपाध्याय ( दोघे रा. मंत्री चंडक, विजापूर रोड), बिभीषण गुलाब लोंढे ( रा. हुडको, कुमठा नाका) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे सपोनि काळे करत आहेत.