बाश्री : पंडित नाथराव नेरळकर संगीत प्रतिष्ठान, श्रीमान नानासाहेब उद्धवराव मनगिरे व्यायामशाळा यांच्या वतीने आयोजित केलेल्या नाद सरिता एक शास्त्रीय मैफील या उत्कृष्ट शास्त्रीय संगीताच्या मेजवानीने बाश्रीकर मंत्रमुग्ध झाले. वीरशैव लिंगायत बोर्डिंग येथे सोमवारी सायंकाळी ही मैफील पार पडली. प्रारंभ सरस्वतीपूजन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शक पंडित नाथराव नेरळकर (औरंगाबाद), रावसाहेब मनगिरे, प्रसाद देशमुख, अमित कुलकर्णी, प्रमोद माळी, सुयोग केसकर, अभिजित कुलकर्णी, महेश काळे, दादा कोरे, प्रताप दराडे आदी उपस्थित होते.पं. नाथराव यांनी अभंगवाणी सादर करुन रसिकांची दाद मिळविली. प्रभाकर कुलकर्णी (तबला), अभिषेक शिनकर आणि अमित कुलकर्णी (हार्माेनियम) यांनी साथ दिली. पुणे येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सतारवादक उस्ताद उस्मान खाँ यांनी सतार वादनात आलाप, तंतुवादनाच्या मिश्रणातून आत्म्याच्या परिसीमेतून परमानंदाच्या आनंदाचा प्रत्यय दिला. सागर परोपकार यांनी त्यांना तबल्याची साथ दिली. या कार्यक्रमास अनेक नामवंत व्यक्ती व रसिकांनी उपस्थित राहून कलाकारांचे कौतुक केले. (प्रतिनिधी) बाश्री येथे आयोजित कार्यक्रमात शास्त्रीय संगीत सादर करताना पंडित नाथराव नेरळकर. त्यांना प्रभाकर कुलकर्णी यांनी तबल्याची तर अभिषेक शिनकर व अमित कुलकर्णी यांनी हार्मोनियमची साथ दिली
शास्त्रीय संगीताने बाश्रीकर मंत्रमुग्ध
By admin | Published: April 20, 2015 1:07 PM