बाळकृष्ण दोड्डी
सोलापूर : दत्तनगर येथील एका दहा बाय दहा खोलीत राहणारा रोहित नागभूषण रव्वा हा महाराष्ट्र राज्य स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे़ रोहित आता महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागात क्लासवन अधिकारी बनला आहे़ आई विडी कामगार आणि वडील यंत्रमाग कामगार असून, आता या कामगाराचा मुलगा महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागात सहायक कार्यकारी अभियंता पदावर काम करणार आहे़ त्यानंतर लवकरच तो कार्यकारी अभियंतादेखील होणार आहे़ १८ नोव्हेंबरला तो उत्तीर्ण झाल्याची बातमी कळताच आई सत्यवतींच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले तर वडील नागभूषण खूपच भावूक झाले़ कष्टाळू आणि प्रामाणिक असलेल्या रोहितचे पूर्व भागात कौतुक होत आहे.
एकूण सहा पदांकरिता महाराष्ट्र राज्य स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा झाली़ एकूण ८० हजारांहून अधिक जणांनी परीक्षा दिली़ यात तो तिसºया रँकने उत्तीर्ण झाला़ एसबीसी प्रवर्गात तो राज्यात प्रथम आहे़ तसेच संपूर्ण राज्यात त्याने पाचवा क्रमांक पटकावला आहे, हे विशेष़ रोहित अत्यंत साधा आहे़ खगोलशास्त्रात त्याला प्रचंड रुची आहे़ त्याचा अभ्यास करत असतो़ त्याचा लहान भाऊ अक्षय याने डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले आहे़ यशाबद्दल बोलताना रोहित म्हणाला, मी सहायक अभियंता पदावर समाधानी नव्हतो़ मला कार्यकारी अभियंता व्हायचे होते़ एमपीएससीची परीक्षा दिली नसती तर मला या पदावर यायला तब्बल पंचवीस ते तीस वर्षांचा कालावधी लागला असता़ क्लासवन अधिकारी होण्याकरिता मी रात्रीचे दिवस करून अभ्यास केलो़ अखेर माझ्या कष्टाचे चीज झाले़ याचे श्रेय माझ्या आईवडिलांना जाते़ आठ दिवसांपूर्वीच रव्वा परिवाराने सत्तर फूट रोड येथील नवीन घरात पदार्पण केले़ यापूर्वी ते दत्तनगर तसेच कुचननगर येथील दहा बाय दहा खोलीत राहत होते.
कर्ज काढून एम़टेकचे शिक्षण केले पूर्ण- जोडबसवण्णा चौकातील महानगरपालिका शाळा क्रमांक तीनमध्ये रोहितचे माध्यमिक शिक्षण झाले़ त्यानंतर त्याने येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये डिप्लोमाचे शिक्षण घेतले़ बी़ई़ सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण डब्ल्यूआयटीमधून पूर्ण केले़ दरम्यान, त्याने एमपीएससीची तयारी सुरु केली़ तसेच गेट परीक्षाही दिली़ गेट परीक्षेत उत्तीर्ण झाला़ तसेच २०१५ साली सहायक अभियंता श्रेणी दोनकरिता परीक्षाही दिली़ एकीकडे एमपीएससीची तयारी अन् दुसरीकडे एम़टेक शिक्षण सुरु होते़ कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग पुणे येथे त्याने एम़टेककरिता अॅडमिशन घेतले़ अॅडमिशन फी भरण्यासाठी त्याने दोन लाख साठ हजार रुपयांचे कर्ज काढले़ सदर कर्जाचे रकम व्याजासह साडेतीन लाख रुपये झाले़ २०१५ साली दिलेल्या सहायक अभियंता परीक्षेचा निकाल एप्रिल २०१७ साली आला़ त्यात तो उत्तीर्ण झाला़ आणि गोंदियात रूजूही झाला़ नोकरी मिळाल्यानंतर त्याने कर्जाची परतफेड केली़ मात्र क्लास टूच्या पदावर तो असमाधानी होता.
स्वप्न झाले पूर्ण- रोहित अत्यंत चिकाटी आहे़ त्याला क्लासवन अधिकारी व्हायचे होते़ ते त्याचे स्वप्न होते़ गोंदिया जिल्ह्यातील देवरी या ठिकाणी सहायक अभियंता पदावर तो २०१७ साली रूजू झाला़ हा भाग नक्षलग्रस्त परिसर म्हणून परिचित आहे़ येथे तो चांगले काम करत होता़ दरम्यान त्याला त्याचे स्वप्न खुणावू लागले़ २०१७ साली पुन्हा त्याने क्लासवनकरिता एमपीएससीची परीक्षा दिली़ त्यात तो अयशस्वी झाला़ यादरम्यान त्याची बदली कुर्डूवाडी येथे झाली़ त्याने धीर सोडला नाही़ पुन्हा २०१८ साली एमपीएससीची परीक्षा दिली़ या परीक्षेचा निकाल १८ नोव्हेंबरला आला़ त्यात तो विशेष गुणासह उत्तीर्ण झाला़ अखेर त्याचे स्वप्न पूर्ण झाले़ याचा सर्वाधिक आनंद त्याच्या आईवडिलांना आहे़ त्यांचे जीवन सार्थक झाल्याची प्रतिक्रिया ते देतात़