घराची कळा अंगण सांगत असते, तशी गावाची कळा शाळा दाखवत असते, बोलत असते. शाळा हे राष्ट्रनिर्मितीचे महत्त्वाचे आद्यकेंद्र, राष्ट्रीय एकात्मतेचे मंदिर असते म्हणून समाजातील जाणकार, जबाबदार घटक शाळांचा दर्जेदारपणा टिकून राहण्यासाठी सातत्याने नवनवीन प्रयोग करत असतात. भावी आयुष्यातील होणारा गुंता शाळा सोडवते. शाळा चांगली मिळाली तर पुढे आयुष्यभर शाळा करण्याची वेळ येत नाही. योग्य वयात शाळा चांगली मिळाली तर माणूस जबाबदार होतो. नाही मिळाली तर गुन्हेगारही होतो. पालकांना शेतातील मळा आणि बालकांना गावातील शाळा समृद्ध करत असते. विद्यार्थी शाळेत आला पाहिजे, शाळेत आलेला विद्यार्थी शैक्षणिक वातावरणात रमला पाहिजे आणि रमलेला विद्यार्थी शाळेत टिकला पाहिजे हे शैक्षणिक सूत्र यशदायी होण्यासाठी, अखंड व अभंग राहण्यासाठी कोरोना महामारी काळातील स्वच्छ शाळा, सुंदर शाळा अभियान हे भारतीय प्रशासन सेवेतील, सोलापूर जिल्हा परिषदेचे आनंददायी स्वामीसूत्र सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. दीड वर्षापासून कोरोनामुळे शाळेत विद्यार्थी नसल्यानं शाळेचा परिसर उदास झाला होता. काळाची पावले ओळखून सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सर्वांना सोबत घेऊन कामाचे नियोजन आणि नियोजनानुसार प्रत्यक्ष कार्यवाही यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळांचे सुशोभीकरण झाले.
भिंती बोलू लागल्या. परसबागा फुलल्या. एक पद, एक वृक्ष हे लक्ष निर्धारपूर्वक बहरू लागले. शिक्षक, पालक यांच्या लाखो रुपये लोकवर्गणीतून, श्रमप्रतिष्ठेतून शाळांचं रुपडं बदललं. स्वच्छ शाळा, सुंदर शाळा, माझी शाळा, आपली शाळा वाटू लागली. कोरोना लवकरात लवकर संपावा शाळेतील बागेत फुले आहेत; पण त्यात रमणारी मुले शाळेत यावीत हाच संकल्प आजमितीला संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थी, शिक्षक, पालकांचा आहे. चांगुलपणाची ही लोकचळवळ चिरंतन आनंददायी राहो हीच सदिच्छा !
- हभप श्री रंगनाथ काकडे गुरुजी