सोलापूर : जन्माला आलेली व्यक्ती एक ना एक दिवस जगाचा निरोप घेणारच... शनिवारी रात्री अंत्यसंस्कार केलेली चिता सकाळपर्यंत जळत होती. एकीकडे चिता जळत असताना दुसरीकडे धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सदस्य कठड्याखाली व आजूबाजूला पडलेली राख आणि कचरा गोळा करीत होते. सकाळी ७ पासून १0.३0 पर्यंत १२५ ते १५० सदस्यांनी पावसाची पर्वा न करता संपूर्ण स्मशानभूमीची स्वच्छता केली.
शहर उत्तरमध्ये मृत्यू होणाºया सर्व जाती-धर्माच्या लोकांचा अंत्यविधी जुना पुणे नाका येथील बाळे स्मशानभूमीत केला जातो. ५ ते ६ एकरातील स्मशानभूमीत सध्या प्रेतांना जाळून अंत्यसंस्कार केला जातो. आजूबाजूच्या परिसरात अनेक मृतदेह जमिनीमध्ये पुरण्यात आले आहेत. स्मशानभूमीत मृतदेह पुरण्यात आलेल्या जागेत काटेरी झुडपे तयार झालेली होती. साधकांनी डोक्यावरच्या पावसाचा विचार न करता स्वत:सोबत आलेल्या दातºया व कुºहाडीने स्वच्छता करण्यास सुरुवात केली.
थडग्यांवरील काटेरी झुडपे व वेली काढत साधकांनी एकमेकांच्या सहायाने स्वच्छता केली. लहान-मोठे वृक्ष कुºहाडीने तोडून बाहेर काढले. काढलेली काटेरी झाडे गोळा करून ती एका ठिकाणी ठेवली जात होती. अंत्यविधीसाठी वापरल्या जाणाºया गवºयांचा भुगा गोळा केला जात होता. जमा केलेला कचरा साधक दोघा- तिघांच्या मदतीने महापालिकेच्या कचरा गाडीत टाकत होते.
कोणी लहान नाही, कोणी मोठं नाही. फार झालं तर एखादी दुसरी सूचना सहकाºयाला केली जात होती; मात्र कोणी कोणाला आदेश देणार नाही. घाण आहे असे लक्षात आले की तो साधक स्वत:हून पुढे होऊन स्वच्छता करीत होता. स्मशानभूमीतील कडेकोपरे, भिंती, बसण्याचे ठिकाण सर्व ठिकाणं कार्यकर्त्यांनी वाटून घेतली होती. अंत्यविधीनंतर त्याच ठिकाणी टाकण्यात आलेल्या तिरड्या, हार, फुले, कपडे, गादी, उशा आदी साहित्य साधक गोळा करत होते. कोणताही साधक थकत नव्हता किंवा बसत नव्हता, जेवढं शक्य होईल तेवढ्या क्षमतेने स्वच्छता करीत होता. पाहता पाहता संपूर्ण स्मशानभूमी साधकांनी चकाचक केली आणि पुढच्या स्मशानभूमीकडे आपला मोर्चा वळवला.
- स्मशानभूमी - 11- सदस्य संख्या - 3300- मिनिटे मोहीम - 330- टन कचरा- 140- 16 टन दगडं