मुंबई : यंदाच्या आषाढी एकादशीला पंढरपूरला येणाऱ्या वारकऱ्यांनी उघड्यावर कोठेही शौचास बसून तेथे घाण करू नये यासाठी आता वारकरी संघटनांनी पुढाकार घेतला असून, दीड हजार वारकरी यासाठी जनजागृती करणार असल्याची माहिती उच्च न्यायालयाला देण्यात आली.पुणे येथील वारकरी साहित्य परिषद या संघटनेचे विठ्ठल पाटील यांनी अॅड. असीम सरोदे यांच्यामार्फत ही माहिती उच्च न्यायालयाला दिली. तसेच स्वच्छतेसाठी पंढरपूर येथे शासन दीड लाख पत्रके वाटणार असून, हे कामदेखील वारकरीच करणार असल्याचेही अॅड. सरोदे यांनी न्यायालयाला सांगितले.न्या. अभय ओक यांच्या खंडपीठासमोर ही माहिती देण्यात आली. ती ग्राह्य धरत न्यायालयाने येथे युद्धपातळीवर शौचालये उभारण्याचे आदेश शासनाला दिले. ही शौचालये नेमकी कोठे असावीत व याविषयी जनजागृती कशा प्रकारे केली जाणार यासाठी पंढरपूर नगर परिषद, वारकरी व सामाजिक संघटना यांनी येत्या सोमवारी बैठक घेऊन याचा आराखडा पुढील बुधवारी न्यायालयात सादर करावा, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणी मानवी विष्ठा वाहतूकविरोधी संघटनेचे अध्यक्ष संदीप जेठे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे़ मानवी विष्ठा वाहतूक प्रतिबंधक कायदा १९९३मध्ये मंजूर झाला़ त्याअंतर्गत हे काम करणाऱ्यांसाठी घरकुलासह विविध योजना राबविणार असल्याचे सरकारने जाहीर केले होते व हे काम मानवाकडून न करता अत्याधुनिक तंत्राद्वारे केले जाणार होते़ मात्र पंढरपूर मंदिरात येणारे भाविक चंद्रभागा नदीपात्रातच प्रात:कालीन विधी उरकतात व त्यांची विष्ठा मानवाकडूनच उचलली जाते़ हे बंद करावे व राज्यात वरील कायद्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश न्यायालयानेच शासनाला द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे़याचे प्रत्युत्तर सादर करताना पंढरपूर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी रवींद्र जाधव यांनी प्रतिज्ञापत्र सादर करून शासनाकडे याबाबत सादर केलेल्या प्रस्तावाची माहिती न्यायालयाला दिली़ ------------------अलोट गर्दी, सार्वजनिक अस्वच्छतापंढरपूर हे १९़५६ चौ़ कि़मी.वर वसलेले आहे़ येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दरवर्षी कोट्यवधी भाविक दर्शनासाठी येतात़ त्यात आषाढी, कार्तिकी, चैत्र व माघी उत्सवासाठी येथे भक्तांची अलोट गर्दी असते़ त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून नगरपालिकेने शौचालये बांधली असून, यासाठी फिरत्या शौचालयांचीही व्यवस्था केली जाते़ तसेच उघड्यावर प्रात:कालीन विधी करू नका, असे आवाहनही नगरपालिका करते़ तरीदेखील भक्तगण उघड्यावरच विधी उरकतात़ ४हे टाळण्यासाठी नवीन शौचालयांची आवश्यकता असून, त्यासाठी लागणाऱ्या निधीचा तपशील देऊन आम्ही शासनाकडे २००९मध्ये प्रस्ताव सादर केला आहे, असे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे़
पंढरपूर स्वच्छतेसाठी दीड हजार वारकरी
By admin | Published: June 22, 2014 12:40 AM