सोलापूर : गुंठेवारी क्षेत्रातील बांधकामांसाठी भूमी अभिलेख विभाग, सिटी सर्व्हे नकाशा सादर करणे आवश्यक आहे. मोजणी नकाशा ५०० रुपयांमध्येच उपलब्ध करून देण्यात यावा, असे स्पष्ट निर्देश नगरविकास खात्याच्या अवर सचिव वीणा मोरे यांनी गुरुवारी दिले आहेत.
महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी शहरात गुंठेवारी क्षेत्रातील बांधकाम परवाने रोखले आहेत. मोजणी नकाशा दिल्याशिवाय परवाने देणार नाही असे त्यांनी सांगितले होते. याविरुद्ध नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. नगरसेवकांचा वाढता दबाव पाहून आयुक्तांनी नगरविकास खात्याकडून मार्गदर्शन मागविले होते. नगरसेवक बाबा मिस्त्री यांनीही यादरम्यान पत्र देऊन तातडीने उत्तर द्यावे, असे म्हटले होते. अवर सचिव वीणा मोरे यांनी निर्देश दिले आहेत. राज्य शासनाने २०२० मध्ये मंजूर केलेल्या एकत्रित विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली गुंठेवारी विकासासाठी लागू आहे. यानुसार विकास परवानगीसाठी सिटी सर्व्हे नकाशा सादर होणे आवश्यक आहे.
--
नवे प्रश्न निर्माण होतील!
भूमिअभिलेख कार्यालयातील अधिकारी गुंठेवारी जागेची मोजणी होऊ शकत नाही, असे सांगतात. लोक मोजणीसाठी ५०० काय १ हजार रुपये देतील; पण गुंठेवारीची सरसकट मोजणी शक्य आहे का? ही मोजणी किती वेळात पूर्ण होईल याची शाश्वती देणे आवश्यक आहे. तरच सरकारच्या पत्राला अर्थ उरतो. या पत्रातून राज्यभरात नवे प्रश्न निर्माण होणार आहे. या प्रश्नातून सुटका व्हायला हवी, असे रिअल इस्टेट ब्रोकर्स असोसिएशनचे संचालक विश्वनाथ कोळी यांनी सांगितले.