सांगोला : तालुक्यातील सात ग्रामपंचायतीचे सरपंचपद रिक्त असून, मंगळवार २९ जून रोजी नव्याने सरपंचपदाच्या फेर आरक्षणाची सोडत काढण्यात आली. त्यामुळे सात ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडीचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती तहसीलदार अभिजित पाटील यांनी दिली.
दरम्यान, जिल्हाधिकारी यांचा दि. १९ जून रोजी सुधारित आदेश निघाले. सांगोला तालुक्यातील सात ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी मंगळवारी सकाळी ११ वाजता सांगोला येथील राजमाता अहिल्याबाई होळकर सभागृहात तहसीलदार अभिजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निजामपूर, खिलारवाडी, हणमंतगाव, तरंगेवाडी, आगलावेवाडी, बुरंगेवाडी, भोपसेवाडी या सात ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी नव्याने फेरआरक्षण सोडत काढण्यात आले.
यावेळी निवासी नायब तहसीलदार किशोर बडवे, महसूल सहायक मल्हारी नाईकनवरे, अमोल देशमुख, मंडलाधिकारी राजेंद्र ननवरे, समाधान वाघमोडे उपस्थित होते. सांगोला तालुक्यातील एकमेव मेथवडे गाव (अनुसूचित जमाती) आरक्षण कायम ठेवून उर्वरित ७५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत कार्यक्रम २२ फेब्रुवारी रोजी घेण्यात आला.
त्यावेळी प्रभाग रचनेमध्ये सरपंचपदासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे निजामपूर, खिलारवाडी, हणमंतगाव, तरंगेवाडी, आगलावेवाडी, बुरंगेवाडी व भोपसेवाडीचे सरपंचपद रिक्त ठेवून दि. २६ फेब्रुवारी रोजी एकाच दिवशी नव्या आरक्षणानुसार सरपंचपदाची निवड केली होती. जिल्हाधिकारी यांनी या सात ग्रामपंचायत सरपंचपदाच्या रिक्त जागेसाठी नव्याने फेर आरक्षण सोडत कार्यक्रम मंगळवारी पार पडला. गेल्या चार महिन्यांपासून सरपंचपदाच्या खुर्चीसाठी आरक्षणाकडे डोळे लावून बसलेल्या इच्छुकांची प्रतीक्षा संपली आहे.