सोलापूर : वातावरणात बदल झाल्याने सर्दी, खोकला व तापाच्या रुग्णांत वाढ झाली आहे. अनेक रुग्ण हे तपासणीसाठी रुग्णालयात जात आहेत. तपासणीसाठी रुग्णालयात रांगा लागल्या असताना बहुतांश रुग्णांना डॉक्टर कोरोना तपासणीचा सल्ला देत नाहीत.
कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. तरीही घरोघरी सर्दी, खोकला, घसा दुखीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत. ही सर्व लक्षणे कोरोनाचीदेखील आहेत. या परिस्थितीत कोरोना चाचणी करणे गरजेचे आहे. सध्या शहरात कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन होताना दिसत नाही. अनेक नागरिक हे मास्कविना फिरत असून फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळत नाहीत. वातावरण बदलासोबतच दिवाळीनंतर सर्दी, खोकला रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात असली तरी या नियमांचे पालन होत नाही. अशातच डॉक्टरही कोरोना चाचणीचा सल्ला देत नाहीत.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कमी असला तरी त्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु शहरातील अनेक खासगी डॉक्टरांकडून या चाचणीचा सल्लाच रुग्णांना दिला जात नाही. घरोघरी सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढल्यावरही कोरोना चाचण्यांची घटती संख्या चिंता वाढवत आहे. कारण ही सर्व लक्षणे करोनाची आहेत. सध्या शहरातील कोरोना चाचण्यांमधून कोरोना पॉझिटिव्ह येणाऱ्या अहवालांची संख्या कमी आहे.
लसीकरणाची प्रभावी अंमलबजावणी झाल्याने सध्या शहर व जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. तरीही जास्तीत जास्त चाचणी होणे गरजेचे आहे. संशयित रुग्ण आल्यास त्याची कोरोना चाचणी करण्याचेच प्रशासनाचे निर्देश आहेत. यासोबतच कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे.
- डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा शल्यचिकित्सक
----------
कोरोना रुग्णालयातील स्थिती
- शहरातील कोरोना बेड - २६९१
- कोरोना रुग्ण - ७०
- संशयित कोरोना रुग्ण - १०
- रिक्त बेड - २६११
----
केवळ एक पॉझिटिव्ह
शहरात सोमवार ८ नोव्हेंबर रोजी फक्त एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला. ३४४ तपासणी अहवाल आले. १८६ जणांची अँटीजेन तर १५८ जणांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली. ३४४ रुग्णांना कोरोना नव्हता. तर दोघे बरे होऊन घरी परतले.