गेल्या वर्षभरामध्ये कोरोनामुळे शेतकरी पुरता उदध्वस्त झाला असून, शेतमालाल किंमत आली नाही. अनेक फळबागा उदध्वस्त झाल्या. याही संकटातून मात करून शेतकरी जोमाने शेती करत असताना ढगाळ वातावरणाचा फटका बसू लागला आहे. ज्वारीला ढगाळ वातावरणामुळे पोषक वातावरण निर्माण झाले होते. परंतू रिमझिम पाऊस पडू लागल्यामुळे बिया तयार करणारा फुलोरा हा गळू लागला आहे.
मंगळवेढा शहरासह काही ठिकाणी दुपारच्या वेळी रिमझिम पावसाची सुरुवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. यंदा पाऊसकाळ चांगला झाला असल्यामुळे मंगळवेढा शिवारातील ज्वारीची पिके जोमात आहेत. मात्र अवकाळी प्रचंड नुकसान होणार आहे. कोरोनामुळे अगोदरच शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून निसर्गराजाने यावर कृपा करावी, अशी शेतकरी वर्गातून प्रार्थना होत आहे.
असे आहे तालुक्यातील क्षेत्र
तालुक्यात ४० हजार हेक्टर ज्वारीचे क्षेत्र आहे तर द्राक्ष क्षेत्र ५ हजार हेक्टर आहे. डाळिंब ६ हजार हेक्टर असल्यामुळे शेतकरी या ढगाळ वातावरणामुळे पाऊस पडण्याची भीती असल्याने हवालदिल झाला आहे. वातावरण असेच ढगाळ राहिले तर ज्वारीचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फायदा होईल, असे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.
--------------