ज्यांच्या ध्यानी-मनी-चित्ती फक्त आणि फक्त विठ्ठल होता, अशा वारकरी संप्रदायातील संतांच्या अनेक गोष्टी आपण ऐकतो-वाचतो. या संतांनी समाजाला - साहित्याला दिलेलं योगदान अतुलनीयच आहे. या संतांची नव्याने, वेगळ्या प्रकारे, अधिक जवळून, ऑन-फिल्ड रिपोर्ताजच्या माध्यमातून ओळख करून देण्याचा यशस्वी प्रयत्न 'रिंगण' हा आषाढी विशेषांक गेली सात वर्षं करतोय. संत सावता माळी यांची 'भेट घडवणाऱ्या' यंदाच्या 'रिंगण'चं प्रकाशन आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं.
संत नामदेव, संत चोखामेळा, संत जनाबाई, संत निवृत्तीनाथ, संत विसोबा खेचर, संत गोरा कुंभार अशा चालत आलेल्या 'रिंगण'च्या दिंडीची शोभा संत सावता माळी यांनी वाढवली आहे. 'संत सावता माळी यांनी दिलेले विचार आजही महत्त्वाचे आहेत. हे विचार तरुण आहेत, बंडखोर आहेत आणि आजच्या काळालाही नवं वळण देण्याची क्षमता त्यांच्यात आहे. 'स्व-कर्मात व्हावे रत, मोक्ष मिळे हातोहात' असं सांगत संत सावता महाराजांनी देव, धर्म आणि भक्ती सोपी केली आहे. त्यांचे विचार तरुणांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा उद्देश आहे, असं रिंगणचे संपादक सचिन परब यांनी सांगितलं.
संत सावता माळी यांच्याशी संबंधित असलेल्या अरण, लऊळ, पंढरपूर, माळीनगर या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पत्रकारांनी त्यांच्याबद्दल विस्तृत माहिती गोळा केली. हे रिपोर्ताज या अंकात आहेत. त्यासोबतच, डॉ. सदानंद मोरे, हरी नरके, डॉ. रणधीर शिंदे, श्यामसुंदर मीरजकर या संतसाहित्याच्या अभ्यासकांनी सावता माळी यांच्या विचारांवर, व्यक्तित्वावर लिहिलेले लेख नवा दृष्टिकोन देणारे आहेत.